विशेष वार्ता महापरिनिर्वाण दिन विशेषांक..समतेचा प्रज्ञापथ महामानवांच्या विचारांनी उजळलेलं राष्ट्र”डॉ.बाबासाहेब आंबेडकरांना महापरिनिर्वाण दिनानिमित्त कृतज्ञ अभिवादन..दीन-दलितांचे खरे उद्धारक महामानवांचे बहुआयामी कार्य-आयु.ज्ञानेश्वर बनसोडे
अहिल्यानगर (प्रतिनिधी):-६ डिसेंबर महापरिनिर्वाण दिनानिमित्त देशभरातून डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांना,कार्याला आणि समतेच्या लढ्याला नमन करण्यात येत आहे.भारतीय घटनेचे शिल्पकार,दीनदलितांचे उद्धारक, सामाजिक न्यायाचे प्रणेते आणि आधुनिक भारतातील समतेचे अग्रदूत म्हणून बाबासाहेबांचे योगदान आजही तितकेच प्रेरणादायी आहे.
✦ दीन-दलितांचे खरे उद्धारक महामानवांचे बहुआयामी कार्य
महात्मा गांधींना स्वातंत्र्य संग्रामातील योगदानासाठी ‘महात्मा’, लोकमान्य टिळकांना त्यांच्या कार्यासाठी ‘लोकमान्य’ हा मान मिळाला; परंतु अस्पृश्यता, जातभेद, सामाजिक अन्यायाच्या अंध:कारात जन्मलेल्या लाखो निराधारांना ‘माणूस’ म्हणून जगण्याचा हक्क मिळवून देणारे एकमेव व्यक्तिमत्त्व म्हणजे डॉ. बाबासाहेब आंबेडकर.फुटीर, विभागलेल्या, जाती-धर्मांच्या चौकटींमध्ये अडकलेल्या समाजाला बंधुता, समता आणि स्वातंत्र्याच्या तत्त्वांनी एकत्र आणून भारतीय प्रजासत्ताक राज्याची मजबूत पायाभरणी त्यांनी केली.
✦ संघर्षातून उभा राहिलेला महामानव
१४ एप्रिल १८९१ रोजी मध्य प्रदेशातील महू येथे रामजी आणि भीमाबाई यांच्या पोटी जन्मलेले भीमराव बालपणापासूनच हलाखीच्या परिस्थितीतून वर आले. रोज १८-१८ तास अभ्यास करून त्यांनी जगातील सर्वोच्च विद्यापीठांमध्ये ज्ञान प्राप्त केले.अस्पृश्यांवर होणाऱ्या अन्यायाची चीड मनात बाळगून त्यांनी समतेचा लढा पुकारला.हीन वागणूक मिळणाऱ्या लाखो लोकांना त्यांनी माणुसकीचा मान, सन्मान व प्रतिष्ठा मिळवून दिली.
✦ अन्यायाविरुद्ध बंड — सत्याग्रहांची अभूतपूर्व शौर्यगाथा
• १९२७ — चवदार तळे सत्याग्रह : पाण्यासाठी मानवी हक्कांची लढाई
• काळाराम मंदिर सत्याग्रह : धार्मिक समतेसाठी ऐतिहासिक लढा,दीन-दलित, बहुजन, पीडित, शोषित जनतेसाठी बाबासाहेबांनी आयुष्यभर संघर्ष केला.गौतम बुद्धांचे समतेचे तत्त्वज्ञान, फुले-साहू यांची सामाजिक सुधारणा आणि आंबेडकरी विचार यांची अखंड परंपरा आजही अविरत सुरू आहे.
✦ घटनेची निर्मिती — समानतेचा संविधानिक पाया
स्वतंत्र भारताच्या घटनासभेत बंगालच्या ‘खुलना’ मतदारसंघातून दलित वर्गाचे प्रतिनिधी म्हणून डॉ. बाबासाहेब आंबेडकर निवडून आले. मुस्लिम लीगने देखील त्यांना पाठिंबा दिला.त्यांच्या मार्गदर्शनाखाली सर्व नागरिकांना समानतेचा अधिकार, सामाजिक न्याय, स्वातंत्र्य आणि बंधुता देणारे आधुनिक, प्रगत आणि मानवतावादी संविधान जगासमोर उभे राहिले.
✦ महामानवांचे विचार आत्मसात करणे हीच खरी श्रद्धांजली
देशाला जागवणाऱ्या, समाजाला दिशा देणाऱ्या या महामानवांच्या विचारांचे अनुसरण करणे हीच खरी अभिवादनाची भावना आहे.माझ्या सर्व भाऊ-बहिणींना नम्र आवाहन आहे —“समता, बंधुता आणि माणुसकीचे तत्त्व जीवनात आणा; तेव्हाच बाबासाहेबांना खरी श्रद्धांजली अर्पण होईल.”
✒️लेखन-सेवा निवृत्त शिक्षक आयु.ज्ञानेश्वर कृष्णाजी बनसोडे,साकुरी, ता.राहाता.जिल्हा अहिल्यानगर मो.९६०४७९७३१६
