महापरिनिर्वाण दिनाचे गांभीर्य जपण्यासाठी रिपब्लिकन पार्टी ऑफ महाराष्ट्राच्या निवेदनाची जैन इंटरनॅशनल स्कूलने घेतली दखल..!स्कूलने 6 डिसेंबरचा गॅदरिंगचा कार्यक्रम तात्काळ बदलला
छत्रपती संभाजीनगर (प्रतिनिधी):-महामानव भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनाच्या पावन स्मृतीचा सन्मान राखत द जैन इंटरनेशनल स्कूलने आपल्या वार्षिक गॅदरिंग कार्यक्रमाची तारीख बदलण्याचा निर्णय घेतला आहे.रिपब्लिकन पार्टी ऑफ महाराष्ट्रच्या निवेदनानंतर शाळा प्रशासनाने हा महत्त्वपूर्ण निर्णय घेतल्याचे अधिकृत पत्रक पक्षाला सुपूर्द करण्यात आले.द जैन इंटरनेशनल स्कूलचा वार्षिक गॅदरिंग कार्यक्रम 6 डिसेंबर 2025 रोजी होणार होता.मात्र, हीच तारीख डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनाची असल्याने कार्यक्रमाबाबत शंका निर्माण झाली.रिपब्लिकन पार्टी ऑफ महाराष्ट्रचे जिल्हाप्रमुख दिनेश गवळे यांनी 1 डिसेंबर रोजी शाळा प्राचार्यांकडे औपचारिक निवेदन सादर केले.त्यांनी निवेदनात नमूद केले की,6 डिसेंबर हा राष्ट्रासाठी अत्यंत भावनिक,शोकमय आणि ऐतिहासिक दिवस आहे.देशभरात लाखो अनुयायी आणि नागरिक या दिवशी बाबासाहेबांना अभिवादन करण्यासाठी विविध श्रद्धांजली उपक्रमांत सहभागी होत असतात.अशा दिवशी उत्सवी शालेय कार्यक्रम घेणे अनुचित आहे.कार्यक्रमाची तारीख पुढे ढकलावी,अन्यथा लोकशाही मार्गाने आंदोलन करण्याचा इशाराही देण्यात आला.रिपब्लिकन पार्टीच्या मागणीची तात्काळ दखल घेत शाळेच्या प्राचार्या यांनी कार्यकारिणीशी चर्चा केली. संवेदनशीलता लक्षात घेत 6 डिसेंबरचा गॅदरिंग कार्यक्रम पुढील योग्य तारखेला हलविण्याचा निर्णय अधिकृतरीत्या घेण्यात आला.
हा निर्णय पक्षाच्या प्रतिनिधी मंडळाला लेखी स्वरूपात देण्यात आला आहे.निवेदन सादरीकरणावेळी अनेक पदाधिकारी उपस्थित होते. त्यात मराठवाडा उपाध्यक्ष सुनील खरात,जिल्हा उपाध्यक्ष अरशाद लखपती,शहर अध्यक्ष रणजीत मनोरे,जेष्ठ नेते प्रकाश घोरपडे,जिल्हा महासचिव राजकुमार अमोलिक,जिल्हा संघटक भीमराव गाडेकर,हन्नु नाना,कडुबा म्हस्के,बादशहा लखपती इ.उपस्थित होते.डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांचा आदर करत,शाळेने घेतलेला हा निर्णय सामाजिक संवेदनशीलतेचे उदाहरण असल्याचे स्थानिक पातळीवर कौतुक होत आहे.
