किडनॅपिंग व पोक्सोच्या आरोपातून दोन आरोपींची निर्दोष मुक्तता..ॲड.शिवाजी कराळे यांचा युक्तिवाद ठरला प्रभावी
अहिल्यानगर (प्रतिनिधी):-अल्पवयीन मुलीचे अपहरण आणि लैंगिक शोषण केल्याचा गंभीर आरोप असलेल्या दोन्ही युवकांची प्रधान जिल्हा व सत्र न्यायाधीश सौ.अंजू शेंडे यांनी निर्दोष मुक्तता केली.तपासातील त्रुटी,साक्षींतील विसंगती आणि मुलीने स्वखुशीने संपर्क साधल्याचे न्यायालयात सिद्ध झाल्याने आरोपींना मोठा दिलासा मिळाला आहे.कोतवाली पोलीस ठाण्यात पिडितेच्या वडिलांनी दाखल केलेल्या फिर्यादीवरून आकाश उर्फ सचिन अंकुश मिसाळ आणि शरद रावसाहेब म्हस्के या दोघांवर भादंवि कलम 363, 366 सह 34 तसेच पोक्सो कायद्यातील कलम 11(iv) अन्वये गु.र.नं. I-509/2021 दाखल करण्यात आला होता. तपास पूर्ण करून दोषारोपपत्र न्यायालयात दाखल करण्यात आले होते.सरकार पक्षाने एकूण सात साक्षीदार तपासले.मात्र, उलटत पासणीत महत्त्वाचे वळण आले.पिडित मुलीनेच आरोपी सचिन याला फोन करून बोलावून घेतले होते,जबरदस्तीचे कोणतेही स्वरूप नव्हते,हे स्पष्ट झाले.तपास अधिकाऱ्यांनी आरोपपत्र दाखल करताना आवश्यक ती तपशीलवार काळजी घेतली नसल्याचेही न्यायालयाच्या निदर्शनास आले.
यामुळे आरोपींना काही दिवस अनावश्यक तुरुंगवास भोगावा लागल्याचा मुद्दा बचाव पक्षाने प्रभावीपणे मांडला.दरम्यान,मुलगी सज्ञान झाल्यानंतर आरोपी सचिन व पिडितेने परस्पर स्वखुशीने विवाह केल्याचेही खटल्यात अधोरेखित झाले.अपहरण किंवा लैंगिक शोषणास अनुसरून कोणतेही ठोस पुरावे उपलब्ध नसल्याचे न्यायालयाने नमूद केले.कोर्टाने सर्व कायदेशीर बाबींचा नीट तपास करून दोष सिद्ध न झाल्याने सीआरपीसी कलम 235(1) नुसार दोन्ही आरोपींची सर्व आरोपांतून निर्दोष मुक्तता जाहीर केली.आरोपींच्या वतीने पुरुष हक्क संरक्षण समिती, अहिल्यानगर तर्फे अध्यक्ष अॅड. शिवाजी कराळे,अॅड. करुणा शिंदे,अॅड. सत्यजीत कराळे, आणि अॅड. मोनाली कराळे यांनी प्रभावीपणे कामकाज हाताळले.
