वंचितांच्या आशेचा दीप उजळला! साधनाताई–बाबा आमटे भवनाचे लोकार्पण, नेदरलँडच्या सेवाभावातून परिवर्तनाचा नवा अध्याय”
अहिल्यानगर (प्रतिनिधी):-“ज्ञान, उपदेश,भाषणे यापेक्षा वंचितांना गरज असते त्या निरपेक्ष प्रेमाची. आणि प्रेमच ही त्यांची खरी ऊर्जा, खरी प्रेरणा आहे”असा भावपूर्ण संदेश नेदरलँडचे समाजसेवक गिरीश ठाकूर यांनी स्नेहालयाच्या आजवरच्या कार्याचा उल्लेख करताना व्यक्त केला.वंचितांसाठी कार्य करणाऱ्या स्नेहालय संस्थेत आज नव्याने उभारण्यात आलेल्या कर्मयोगिनी साधनाताई आणि महामानव बाबा आमटे भवनाचे लोकार्पण दिमाखात पार पडले.15 हजार चौरस फुटांच्या या अत्याधुनिक संकुलामुळे 18 वर्षांवरील अनाथ,एचआयव्ही बाधित आणि शारीरिक–मानसिक दृष्ट्या विविध अडचणी असणाऱ्या युवक-युवतींच्या पुनर्वसनाला नवे बळ मिळणार आहे.या भवनासाठी मदत देणारे द नेदरलँड येथील आधार फॉर यू संस्थेचे संस्थापक सौ.वृंदा आणि गिरीश ठाकूर विशेष उपस्थित होते. तसेच जिल्ह्याचे भुईअभिलेख उपअधीक्षक अविनाश मिसाळ,नगरचे पोलीस उपाधीक्षक डॉ. दिलीप टिपरसे, फोरकस इम्पेक्सचे व्यवस्थापकीय संचालक राजेश जग्गी,औद्योगिक क्षेत्राचे मार्गदर्शक अरविंद पारगावकर, जिल्हापरिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आनंद भंडारी आदी मान्यवरांनीही उपस्थिती दर्शवली.
श्री. ठाकूर म्हणाले,“अनाथ मुलांचे सर्वांत कठीण दिवस हे 18 वर्षांनंतरचे. एचआयव्ही बाधित वा दिव्यांग मुलांना आजही समाजात अस्पृश्यतेची वागणूक मिळते. अशा स्थितीत स्नेहालयाचे हे सुसज्ज संकुल म्हणजे परिवर्तनाचा दीप आहे.उपअधीक्षक मिसाळ आणि डॉ.टिपरसे म्हणाले की,स्पर्धा परीक्षा तयारीच्या काळात स्नेहालयाबद्दल खूप ऐकले,परंतु प्रत्यक्ष येऊन कार्य पाहिल्यावर संस्थेचे परिमाण समजले.जया जोगदंड यांनी सांगितले की,
“स्नेहालयाची वैशिष्ट्यपूर्ण ओळख म्हणजे—इथलेच लाभार्थी, सक्षम झाल्यावर, संस्थेचे सुकाणू स्वतः हाती घेतात. निरपेक्ष सेवाकार्यात हीच आमची मोठी ताकद आहे.स्नेहालयची विद्यार्थिनी कुमारी साक्षी नरवडे हिने बाबा आमटे यांच्या “शृंखला पाय असू दे…” आणि “थांबला ना सूर्य…” या प्रेरणागीतांनी वातावरण भारावले.डॉ. प्रीती भोम्बे, गीता कौर, मिलिंद एकनाथ कुलकर्णी, राजीव गुजर, संजय बंदिष्टी यांनी कार्यक्रमाचे नियोजन केले.अनिल गावडे यांनी प्रास्ताविक केले, अॅड. शाम आसावा यांनी आभार प्रदर्शन केले, तर सौ. स्वाती रानडे यांनी कार्यक्रमाचे उत्कृष्ट सूत्रसंचालन केले.
संगीता सानप,जनसंपर्क विभाग M. 9011020178
