ज्येष्ठ लोककलावंत संबळ वादक संपत भालेराव यांचे निधन
संगमनेर प्रतिनिधी (नितीनचंद्र भालेराव):-महाराष्ट्रातील संस्कृती विविध लोकसंगीत अन् वाद्य प्रकारने नटलेली आहे.याच वाद्य प्रकारातील एक प्रकार म्हणजे संबळ वादन.संबळ वाजलं आणि पावलं थिरकली नाही असं कधी होणार नाही.संबळमध्ये एक विशिष्ट प्रकारचा लय, तालबद्धतेमुळे अनेकांना नाचायला भाग पाडणारे संबळ वादक संपत विश्राम भालेराव. असंख्य कार्यक्रमांमध्ये संबळ वादनाचे सादरीकरण केले असे हिवरगाव पावसा येथील ज्येष्ठ संबळ वादक संपत भालेराव यांचे वृद्धापकाळाने वयाच्या 83 व्या वर्षी निधन झाले आहे.लोककलावंत म्हणून संपत भालेराव यांनी तब्बल 50 वर्षे कार्य केले. त्यांच्या निधनानंतर रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे प्रदेशाध्यक्ष उपाध्यक्ष श्रीकांत भालेराव,मास्टर रघुवीर खेडकर,राजहंस दूध संघाचे संचालक डॉक्टर प्रमोद पावसे,भाजपा माजी तालुकाध्यक्ष काशिनाथ पावसे,सरपंच सुभाष गडाख,गणेश दवंगे,मास्टर विलास कुमार( राज) गायकवाड देवठाणकर सह सौ.शेषकन्या पुणेकर लोकनाट्य तमाशा मंडळ केंद्र संगमनेर,भारत नागपूरकर,सविता पुणेकर,सुनील औरंगाबादकर यांच्या सह लोककला क्षेत्रातील अनेक कलाकारांनी तसेच मान्यवरांनी शोक व्यक्त केला आहे.
आपल्या संबळ वादनाच्या अनोख्या शैलीसाठी प्रसिद्ध असणाऱ्या संपत भालेराव यांचे वृद्धपकाळाने निधन झाले.संपत भालेराव यांनी अत्यंत कष्टाने आणि जिद्दीने शून्यातून आपले विश्व निर्माण केले.हिवरगाव पावसा हे गाव कलावंतांची भूमी म्हणून ओळखली जाते.संपत भालेराव यांना मुळातच संगीत क्षेत्राची आवड होती.आद्यनृत्यांगणा नामचंद पवळा भालेराव हिवरगावकर व कलाभूषण लहुजी भालेराव यांच्या समृध्द कलेचा वारसा हिवरगाव पावसा कला नागरीत टिकविण्याचे कार्य जुन्या पिढीतील कलावंतांनी केले आहे.त्यापैकी संपत भालेराव यांनी संबळ वादक म्हणून नगर,पुणे जिल्ह्यात नावलौकिक मिळवला.संगीत हाच ध्यास आणि संगीत हाच श्वास हा मंत्र त्यांनी अखेरपर्यंत जपला.घरची गरिबीची हलाखीची परिस्थिती असताना संपत भालेराव यांनी पत्नी सुनंदा,मुलगा चंद्रकांत व सूर्यकांत,मुलगी जयश्री यांच्या सहकाऱ्याने कोरडवाहू जमिनीवर ओसाड मळरानावर हिरवागार शेतमळा फुलवला.
विहिरी,मोटार व पाईपलाईन करून बागायती शेती विकसित केली.लोककलावंत भालेराव त्यांच्या पश्चात पत्नी,दोन मुले एक मुलगी,सुना,नातवंडे असा मोठा परिवार आहे.त्यांच्या निधनाने हिवरगाव पावसा पंचक्रोशीतून हळहळ व्यक्त होत आहे.त्यांचा जलदन विधी हिवरगाव पावसा हनुमान मंदिरासमोरील सामाजिक सभागृह येथे गुरुवार दि. 4 डिसेंबर रोजी सकाळी 9 वाजता होणार आहे.
