मिलिंद महाविद्यालयाच्या पावन भूमीत भीमस्मृतीचा दरवळ..रिपब्लिकन पार्टी ऑफ महाराष्ट्रतर्फे महापरिनिर्वाण दिनी बाबासाहेबांना अभिवादन
छत्रपती संभाजीनगर (प्रतिनिधी):-भारतीय राज्यघटनेचे जनक, समाजसुधारक,मानवतेचे महामानव भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या ६९ व्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त ऐतिहासिक व पवित्र अशा मिलिंद महाविद्यालयाच्या प्रांगणात रिपब्लिकन पार्टी ऑफ महाराष्ट्रतर्फे अभिवादन सोहळा आयोजित करण्यात आला. बाबासाहेबांनी स्वतःस्थापन केलेल्या या संस्थेच्या भूमीत उभे राहून त्यांना नतमस्तक होण्याचा सन्मान लाभल्याची भावना उपस्थितांनी व्यक्त केली.पक्षाचे राज्य सचिव सुरेश शिनगारे यांनी बाबासाहेबांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.यानंतर आयोजित स्मरण सभेत पक्षप्रमुख राजुभाई साबळे यांनी बाबासाहेबांच्या कार्याचा उल्लेख करत भावनिक शब्दांत कृतज्ञता व्यक्त केली.

“डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी स्थापन केलेल्या मिलिंद महाविद्यालयातून मराठवाड्यात शिक्षणाची क्रांती घडली.वंचित,तळागाळातील समाजाला शिक्षणाचे दरवाजे उघडून दिले.त्यांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या या भूमीत उभे राहिल्यावर अपूर्व ऊर्जा मिळते,” असे साबळे म्हणाले.या वेळी परिसरात ‘डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा विजय असो!’ अशा जयघोषांनी वातावरण दुमदुमले.कार्यक्रमास रिपब्लिकन पार्टी ऑफ महाराष्ट्रचे अनेक वरिष्ठ पदाधिकारी,कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. राज्य उपाध्यक्ष अॅड.अविनाश थिट्टे,राज्य सचिव सुरेश शिनगारे, जिल्हाप्रमुख दिनेश गवळे, मराठवाडा उपाध्यक्ष सुनील खरात,जिल्हा उपाध्यक्ष अरशाद लखपती, जिल्हा कार्याध्यक्ष जयनाथ बोर्डे,शहराध्यक्ष रणजित मनोरे, जिल्हा महासचिव राजकुमार अमोलिक, तसेच प्रदीप धनेधर, विलास साळवे यांच्यासह पक्षाचे अनेक पदाधिकारी उपस्थित होते.महामानवांच्या स्मरणार्थ आयोजित हा अभिवादन सोहळा अत्यंत श्रद्धाभावाने आणि उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला.
