६ डिसेंबरला डॉ.बाबासाहेब आंबेडकरांना वाहिली जाणार स्वरांजली..रिपब्लिकन पार्टी ऑफ महाराष्ट्र पक्षाच्या आक्रमक भूमिकेनंतर एम.आय.टी. मधील ‘स्वर झंकार’ महोत्सवाच्या रूपरेषेत तात्काळ बदल
छत्रपती संभाजीनगर (प्रतिनिधी):-येथील एम.आय.टी. (MIT) महाविद्यालय परिसरात आयोजित करण्यात आलेल्या ‘स्वर झंकार संगीत महोत्सवा’च्या कार्यक्रमात ६ डिसेंबर रोजी महत्त्वाचा बदल करण्यास आयोजकांना भाग पाडले आहे. रिपब्लिकन पार्टी ऑफ महाराष्ट्रने घेतलेल्या आक्षेपानंतर आणि दिलेल्या निवेदनानंतर आता ६ डिसेंबर रोजी, महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनाचे औचित्य साधून त्यांना ‘स्वरांजली’ अर्पण करण्यात येणार आहे.
याबाबत सविस्तर माहिती अशी की, एम.आय.टी. महाविद्यालयातर्फे ‘स्वर झंकार’ या सांगीतिक महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. मात्र, ६ डिसेंबर हा दिवस भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा महापरिनिर्वाण दिन आहे. या दिवशी संपूर्ण देश बाबासाहेबांच्या स्मृतीस विनम्र अभिवादन करत असताना, केवळ मनोरंजनात्मक स्वरूपाचा कार्यक्रम घेणे हे औचित्याला धरून नाही, अशी ठाम भूमिका ‘रिपब्लिकन पार्टी ऑफ महाराष्ट्र’ पक्षाचे जिल्हाध्यक्ष दिनेश गवळे सुनील खरात अर्शद लखपती प्रकाश घोरपडे प्रदीप धनेधर विलास साळवे यांनी घेतली होती.
पक्षाच्या शिष्टमंडळाने आयोजक जनरल डायरेक्टर मूनीश शर्मा यांच्याशी चर्चा करून ६ डिसेंबरच्या कार्यक्रमाचे स्वरूप बदलण्याची मागणी केली होती. आमच्या मागणीचा विचार करण्यात येवुन अखेर महामानवाला आदरांजली वाहण्यासाठी आयोजकांनी कार्यक्रमाच्या रूपरेषेत बदल मान्य केला आहे.त्यानुसार, आता ६ डिसेंबर रोजी होणाऱ्या या कार्यक्रमाची सुरुवात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून आणि अभिवादन करून होईल. तसेच, या दिवशीचा सांगीतिक कार्यक्रम हा बाबासाहेबांना समर्पित करून त्यांना ‘स्वरांजली’ वाहिली जाईल.कार्यक्रमाच्या आयोजकांनी लेखी स्वरूपाचे पत्र पक्षाचे जिल्हाध्यक्ष व पदाधिकारी यांना देण्यात आले आहे त्यावर पक्षाच्या वतीने समाधान व्यक्त करण्यात येवून त्यांचे आभार व्यक्त केले.
