” प्रासाद इथे भव्य परि मज भारी..आईची झोपडी प्यारी…”
अहिल्यानगर (प्रतिनिधी):-आपल्या कर्तृत्वाची पताका जगभर फडकत असली आणि भौतिक सुखे पायाशी लोळण घेत असली तरीही आपली आपली आई – मातृभूमी आणि गावाची महत्ता देशभक्ताला सरसच वाटते.स्वातंत्र्यवीर सावरकर यांनी डिसेंबर 1909 मध्ये इंग्लंड मधील ब्रायटनच्या समुद्रकिनाऱ्यावर लिहिलेल्या ” सागरा प्राण तळमळला “या देशभक्तीपर कवितेमधील वरील ओळी एका नगरकराने सार्थ ठरविल्या. अहिल्यानगरचे मूळ रहिवासी आणि सध्या इंग्लंडमध्ये स्थायिक झालेल्या महेश राम सासवडे यांनी आपल्या 50 व्या जन्मदिनाचे औचित्य साधून 5 हजार पौंडांचा ( सुमारे 6 लाख रुपयांचा ) अर्थसहयोग वंचितांच्या विकासासाठी स्नेहालय संस्थेला दिला.वडिलांच्या अकाली निधनामुळे सावेडी हडको कॉलनीतील लहानशा कोपऱ्यात राहून आईने काबाडकष्ट करून महेश यांना शिकवले.
येथील रेसिडेन्शियल विद्यालयात शालेय आणि उच्च माध्यमिक शिक्षण महेश यांनी घेतले. कोपरगाव येथील संजीवनी अभियांत्रिकी महाविद्यालयातून 1993 मध्ये संगणक अभियांत्रिकीची पदवी मिळवली. कामाची आणि नवे शिकण्याची उत्तम संधी शोधण्यासाठी श्री. सासवडे 25 वर्षांपूर्वी धाडस करून इंग्लंड येथे गेले.आपली मातृभूमी आणि मूळ गाव अहिल्यानगर साठी काहीतरी करण्याची महेश यांची नेहमीच तीव्र इच्छा होती.इंग्लंडमधील नॉटिंगहॅम येथील इंग्लंडच्या शासकीय रुग्णसेवेतील नामांकित डॉक्टर, मूळ नगरकर आणि स्नेहालयाचे पालक असलेल्या डॉ. कौस्तुभ निसळ यांनी श्री सासवडे यांना स्नेहालयची माहिती दिली.
आजारी आईच्या सेवेसाठी श्री. सासवडे अहिल्यानगर येथे आले असताना त्यांनी स्नेहालयाच्या प्रकल्पांना भेटी दिल्या. मानवतेचे येथील निरपेक्ष कार्य त्यांच्या मनाला स्पर्श करून गेले.अहिल्यानगर मधील स्नेहालयाच्या प्रेरणेतून ‘स्नेहालय युके’ (Snehaalaya UK) ही संस्था इंग्लंडमध्ये मागील 12 वर्षांपासून कार्यरत आहे . या संस्थेमार्फत स्नेहालय ला आर्थिक सहयोग दिल्यास इंग्लंडच्या नागरिकांना कर सवलत मिळते. त्यामुळे या माध्यमातून श्री सासवडे यांनी हा आर्थिक सहयोग दिला. स्नेहालय संस्थेसाठी काम करणाऱ्या कार्यकर्त्यांनी इंग्लंड प्रमाणेच अमेरिका, जर्मनी या देशातही स्नेहालय याच नावाने संस्था स्थापन केल्या आहेत.
स्नेहालय संस्थेत आयोजित कृतज्ञता सोहळ्यात श्री सासवड यांनी नमूद केले की , ” परदेशात स्थायिक असलेल्या भारतीयांनी आपल्या गावातील किंवा देशातील सामाजिक बदलांच्या कामांना हातभार लावणे हे त्यांचे कर्तव्यच आहे. या दृष्टीने अन्य नागरिकांना त्यातही अहिल्यानगर जिल्हा वासीयांना मदत व मार्गदर्शन करण्याचे काम आपण भविष्यात करणार आहोत “.स्नेहालय तर्फे स्नेहालय युकेच्या प्रमुख श्रीमती जॉयस कोनोली, निक कॉक्स ,डॉ. प्रीती भोम्बे , जया जोगदंड, अनिल गावडे, गिरीश कुलकर्णी, राजीव गुजर, मिलिंद कुलकर्णी, एडवोकेट श्याम आसावा यांनी श्री सासवड यांचे अभिष्टचिंतन केले…
संगीता सानप स्नेहालय,मो.9011020178
