हक्काच्या घरासाठी पोलिस पत्नी आक्रमक;वरळीमध्येच घर’ या मागणीवर माजी मंत्री आ.आदित्य ठाकरे यांच्याशी शिष्टमंडळाची सविस्तर चर्चा
वरळी/प्रतिनिधी (दि. 12 डिसेंबर):-वरळी पोलिस कॅम्पमधील “पोलिसांना वरळी मध्येच हक्काची घरे” हा अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेला प्रश्न आता पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.पोलिस कुटुंबांचे संभाव्य विस्थापन,राहणीमानातील अडचणी आणि मूलभूत सुविधांच्या कमतरतेच्या पार्श्वभूमीवर पोलिस पत्नी,शिवसेना महिला पदाधिकारी तसेच निवृत्त पोलिस कर्मचारी यांनी एकत्र येत जोरदार चळवळ सुरू केली आहे.याच अनुषंगाने वरळीतील पोलिस पत्नी व कुटुंबीयांचे एक शिष्टमंडळ नुकतेच उबाठा गटाचे माजी मंत्री व आमदार आदित्य ठाकरे यांची भेट घेण्यासाठी गेले होते स्वतःचे त्यांना यावेळी निवेदनही देण्यात आले.
या भेटीत त्यांनी “वरळीतीलच घर” ही मुख्य मागणी पुनर्प्रस्तावित करीत,कॅम्पमधील परिस्थिती, विस्थापनाचा धोका आणि भेडसावणाऱ्या अडचणींबाबत सविस्तर मांडणी केली.शिष्टमंडळाने आदित्य ठाकरे यांच्यासमोर कुटुंबांच्या समस्या अत्यंत ठामपणे मांडताना “पोलिसांनी आयुष्यभर मुंबई शहरासाठी धोका पत्करला; त्यांच्या कुटुंबांना स्थिर,सुरक्षित घराचा हक्क मिळालाच पाहिजे”, अशी मागणी केली.या समस्यांचा तातडीने पुनर्विचार करून प्रत्यक्ष उपाययोजना राबविण्याची विनंतीही या शिष्टमंडळाने केली. शिष्टमंडळामध्ये पोलीस पत्नी सुरेखा (रुक्मिणी) चौगुले पाटील यांच्या नेतृत्वाखाली कल्पना सुर्वे,दर्शना गुरव सावंत,ज्योती तोंडवळकर तसेच निवृत्त पोलिस कर्मचारी कदम आणि माने यांनी सहभाग घेतला होता.बैठकीत कॅम्पमधील सध्याच्या स्थितीवर प्रामाणिक व अचूक अहवाल सादर करण्यात आला.पोलिस पत्नी आणि निवृत्त कर्मचाऱ्यांच्या पुढाकारामुळे वरळी पोलिस कॅम्पचा गृहप्रश्न पुन्हा चर्चेत आला असून आगामी काळात राजकीय पातळीवरही तापमान वाढण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. कॅम्पमधील हजारो पोलिस कुटुंबांच्या भवितव्याशी निगडित असल्याने या प्रश्नाकडे सर्वच घटकांचे लक्ष लागले आहे.
