मानव-पशूंचे जीव घेणाऱ्या नायलॉन मांजाला ‘नो एंट्री’; छत्रपती संभाजीनगरात रिपब्लिकन पार्टी ऑफ महाराष्ट्र ची पोलीस आयुक्तांकडे कठोर कारवाईची मागणी
छत्रपती संभाजीनगर (प्रतिनिधी):-शहरात जीवघेणा व कायद्याने बंदी असलेला नायलॉन मांजा खुलेआम विक्रीस उपलब्ध असून,त्यावर तात्काळ नियंत्रण ठेवण्यासाठी कठोर पावले उचलावीत,अशी मागणी रिपब्लिकन पार्टी ऑफ महाराष्ट्रतर्फे सहाय्यक पोलीस आयुक्त मनोज पगारे यांच्याकडे निवेदनाद्वारे करण्यात आली.नायलॉन मांजाच्या वापरामुळे दुचाकीस्वार,पादचारी, लहान मुले तसेच निष्पाप पक्षी-प्राण्यांचे जीव धोक्यात येतात.धारदार मांजामुळे होणाऱ्या गंभीर जखमांमुळे अनेकांना जीव गमवावा लागल्याच्या घटना राज्यभरात घडल्या आहेत. शिवाय हा मांजा जैव-विघटनशील नसल्याने पर्यावरणाचेही मोठे नुकसान होत असल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले.माननीय राष्ट्रीय हरित न्यायाधिकरण (NGT) तसेच उच्च न्यायालयाने नायलॉन मांजाच्या विक्री,साठवणूक व वापरावर संपूर्ण बंदी आदेश दिले आहेत.तरीही शहरातील काही दुकानांमध्ये हा मांजा छुप्या मार्गाने विकला जात असल्याची तक्रार करण्यात आली.
रिपब्लिकन पार्टीने एसीपींकडे खालील प्रमुख मागण्या केल्या
• शहरातील सर्व दुकानांमध्ये नायलॉन मांजा विक्री तात्काळ बंद करण्याचे आदेश द्यावेत.
• छुप्या पद्धतीने मांजा विक्री करणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्यासाठी स्वतंत्र भरारी/इन्स्पेक्शन पथके नेमावीत.
• या पथकांनी शहरात नियमित गस्त घालून न्यायालयीन आदेशांचे काटेकोर पालन व्हावे.
या निवेदनाकरिता पक्षाचे जिल्हा प्रमुख दिनेश गवळे,मराठवाडा उपाध्यक्ष सुनील खरात,जिल्हा उपाध्यक्ष अरशाद लखपती,शहर उपाध्यक्ष अनिस गंगापूरकर,अशोक शिरसाठ,हन्नु नाना आदी पदाधिकारी उपस्थित होते.
