नगर शहराच्या इतिहासात सुवर्णाक्षरांनी नोंद!..प्रोफेसर चौकात संभाजी महाराजांच्या पुतळ्याचे मंगळवारी भव्य उद्घाटन.. उद्घाटन सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर आमदार संग्राम जगताप यांची पाहणी व कार्यक्रम नियोजनाबाबत अधिकाऱ्यांना सूचना
अहिल्यानगर (प्रतिनिधी):-अहिल्यानगर शहरातील प्रोफेसर चौकात छत्रपती संभाजी महाराज यांचा पुतळा उभारावा,ही नगरकरांची अनेक वर्षांपासूनची मागणी अखेर पूर्णत्वास जात आहे. मंगळवारी (ता.१६) राज्याचे पालकमंत्री नामदार राधाकृष्ण विखे पाटील यांच्या हस्ते छत्रपती संभाजी महाराजांच्या पुतळ्याचे भव्य उद्घाटन होणार आहे.या ऐतिहासिक सोहळ्यामुळे संपूर्ण शहरात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे.या उद्घाटन सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर आमदार संग्राम जगताप यांनी आज (ता.१४) दुपारी प्रोफेसर चौकातील छत्रपती संभाजी महाराज स्मारक परिसराची पाहणी केली.यावेळी पुतळा परिसरातील सजावट,स्वच्छता, वाहतूक व्यवस्थापन तसेच कार्यक्रमाच्या नियोजनाबाबत संबंधित अधिकाऱ्यांना आवश्यक सूचना देण्यात आल्या.उद्घाटन कार्यक्रम अत्यंत शिस्तबद्ध,भव्य व लोकाभिमुख पद्धतीने पार पडावा,यावर आमदार जगताप यांनी भर दिला.
छत्रपती संभाजी महाराज हे स्वराज्याचे दुसरे छत्रपती,धर्मरक्षक,पराक्रमी आणि बलिदानी योद्धा म्हणून ओळखले जातात.त्यांच्या शौर्याचे व त्यागाचे स्मरण म्हणून उभारण्यात येणारा हा पुतळा प्रोफेसर चौकाच्या ऐतिहासिक व सांस्कृतिक महत्त्वात भर घालणारा ठरणार आहे.या चौकातून दररोज हजारो नागरिकांची व विद्यार्थ्यांची ये-जा होत असल्याने हा पुतळा प्रेरणास्थान ठरणार असल्याची भावना व्यक्त केली जात आहे.उद्घाटन कार्यक्रमास लोकप्रतिनिधी,प्रशासनातील वरिष्ठ अधिकारी,विविध सामाजिक संघटनांचे पदाधिकारी, शिवप्रेमी व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित राहणार आहेत. नगर शहराच्या इतिहासात एक महत्त्वाचा अध्याय जोडणारा हा सोहळा ठरणार असून,छत्रपती संभाजी महाराजांच्या स्मृतींना अभिवादन करण्यासाठी नगरकर सज्ज झाले आहेत.
