ज्ञानयज्ञाचा गौरव सोहळा..! समाजसेविका सौ.सुमन देसाईंसह देशभरातील पाच साहित्य साधिकांना ‘ज्ञानयज्ञ साहित्य पुरस्कार’ जाहीर..२८ डिसेंबरला कोल्हापुरात होणार भव्य सन्मान..!
वसई–विरार प्रतिनिधी (मनिषा जाधव):-मराठी साहित्याच्या ग्रामीण प्रवाहाला बळ देणाऱ्या आणि साहित्य चळवळीला नवे अधिष्ठान देणाऱ्या २०२६ मराठी ग्रामीण साहित्य संमेलनाचे आयोजन कोल्हापूर येथील करवीर वाचन मंदिर येथे करण्यात आले आहे. कवी सरकार कवी सरकार स्वाभिमानी वाचनालय,इंगळे यांच्या वतीने आयोजित या संमेलनात साहित्य,समाजकार्य आणि सांस्कृतिक क्षेत्रात उल्लेखनीय योगदान देणाऱ्या मान्यवरांना सन्मानित करण्यात येणार आहे.या साहित्य संमेलनाच्या पार्श्वभूमीवर यंदाचा प्रतिष्ठेचा ‘ज्ञानयज्ञ साहित्य पुरस्कार’ जाहीर करण्यात आला असून, विविध क्षेत्रांत सातत्यपूर्ण व प्रेरणादायी कार्य करणाऱ्या पाच महिलांची या पुरस्कारासाठी निवड करण्यात आली आहे.यामध्ये समाजसेविका सौ.सुमन गजानन देसाई (मीरा–भाईंदर, मुंबई) यांच्यासह सौ.सुलक्षणी बाळगी (ठाणे), सुनीता क्षीरसागर (उल्हासनगर, मुंबई),सौ.विद्या साबळे (सोलापूर) तसेच रोहिणी दीक्षित (चिक्कोडी, कर्नाटक) यांचा समावेश आहे.सदर मान्यवरांनी आपल्या लेखनातून,सामाजिक जाणीवेतून आणि साहित्यसेवेतून समाजप्रबोधनाचे महत्त्वपूर्ण कार्य केले आहे.
ग्रामीण व शहरी साहित्यविश्वात समान आदर मिळवणाऱ्या या साहित्य साधिकांच्या कार्याची दखल घेत ज्ञानयज्ञ साहित्य पुरस्कार देऊन त्यांना गौरवण्यात येणार आहे.दि.२८ डिसेंबर रोजी कोल्हापूर येथे होणाऱ्या या पुरस्कार वितरण सोहळ्यासाठी साहित्यिक, विचारवंत,समाजसेवक व रसिक मोठ्या संख्येने उपस्थित राहणार असून, हा कार्यक्रम मराठी साहित्यविश्वासाठी एक महत्त्वाचा व प्रेरणादायी क्षण ठरणार आहे.या पुरस्कार घोषणेमुळे सर्व पुरस्कारार्थींवर अभिनंदनाचा वर्षाव होत असून, त्यांच्या कार्याबद्दल साहित्य व सामाजिक क्षेत्रातून विशेष कौतुक व्यक्त करण्यात येत आहे.
