अल्पसंख्यांक हक्क दिनी प्रशासनाला थेट सवाल..!इंजि. यश शहा यांची जिल्हाधिकाऱ्यांकडे आक्रमक मागणी..योजनांची ‘वन-स्टॉप’ अंमलबजावणी..कर्ज–शिष्यवृत्तीवसतिगृहांवर तात्काळ निर्णयाचे आश्वासन
अहिल्यानगर (प्रतिनिधी):-१८ डिसेंबर रोजी अल्पसंख्यांक हक्क दिन अहिल्यानगर जिल्हाधिकारी कार्यालयात उत्साहात साजरा करण्यात आला. जिल्हाधिकारी डॉ. पंकज अशिया यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या बैठकीत मिशन सेफ विहारचे अध्यक्ष व निमंत्रित जैन समाज प्रतिनिधी इंजिनिअर यश प्रमोद शहा यांनी अल्पसंख्यांक समाजातील प्रलंबित प्रश्नांवर थेट, ठोस व आग्रही भूमिका मांडली.यावेळी बोलताना इंजि. शहा यांनी मुख्यमंत्री, महाराष्ट्र पोलीस, अल्पसंख्यांक विभाग तसेच विशेषतः अहिल्यानगर जिल्हा प्रशासन व जिल्हा पोलीस प्रशासनाचे आभार मानले. जैन समाजातील सर्व चारही पंथांच्या गुरुभगवंतांना विहार पदभ्रमणादरम्यान पोलीस सुरक्षा दिली जात असल्याने विहार सुरक्षित व निर्विघ्न होत असल्याचे त्यांनी नमूद केले. ही व्यवस्था समाजासाठी मोठा दिलासा ठरत असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.यानंतर इंजि. शहा यांनी अल्पसंख्यांक बांधवांना भेडसावणाऱ्या विविध समस्यांकडे प्रशासनाचे लक्ष वेधले.अल्पसंख्यांक योजनांची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी जिल्ह्यात ‘एक खिडकी योजना’ तात्काळ सुरू करावी, जेणेकरून सर्व योजनांची माहिती एका ठिकाणी उपलब्ध होईल, अशी आग्रही मागणी त्यांनी केली.तसेच मौलाना आझाद आर्थिक विकास महामंडळाला जुन्या जिल्हाधिकारी कार्यालयात स्वतंत्र कार्यालयाची जागा द्यावी, जेणेकरून कर्ज व इतर योजनांबाबत समाजबांधवांना थेट संपर्क व मार्गदर्शन मिळेल, अशी मागणी करण्यात आली.

जिल्ह्यासाठी व्यवसाय कर्ज योजना तात्काळ सुरू करून आवश्यक निधी उपलब्ध करून द्यावा, यासाठी प्रशासनाने शासनाकडे पाठपुरावा करावा, अशी स्पष्ट भूमिका त्यांनी मांडली. कर्ज योजनांची माहिती वृत्तपत्रे व सार्वजनिक ठिकाणी बॅनरद्वारे प्रसिद्ध करावी, तसेच बँक अधिकाऱ्यांची एकत्रित बैठक घेऊन कर्ज प्रकरणातील तांत्रिक अडचणी तात्काळ सोडवाव्यात, असेही त्यांनी सुचवले.शिक्षण विभागाबाबत बोलताना इंजि. शहा यांनी माध्यमिक व उच्च माध्यमिक शिष्यवृत्ती योजना प्रभावीपणे राबवण्यासाठी सर्व मुख्याध्यापकांची संयुक्त बैठक घ्यावी व शाळा–महाविद्यालयांच्या दर्शनी भागात अल्पसंख्यांक योजनांची माहिती लावावी, अशी मागणी केली.तहसील कार्यालयातून उत्पन्न, EWS व इतर दाखले विद्यार्थ्यांना वेळेत मिळावेत, तसेच अल्पसंख्यांक प्रमाणपत्रे शासनामार्फत जलद गतीने देण्यात यावीत, अशी आग्रही मागणीही त्यांनी केली.शहरातील अल्पसंख्यांक विद्यार्थ्यांसाठी उभारण्यात येणारी वसतिगृहे तात्काळ सुरू करावीत, तसेच पंतप्रधान १५ सूत्री कार्यक्रमांबाबत जिल्हाधिकारी कार्यालयात तिमाही बैठक घेण्यात यावी, जेणेकरून प्रशासकीय अडचणी तत्काळ मार्गी लागतील, अशी सूचना यावेळी करण्यात आली.या सर्व मुद्द्यांवर जिल्हाधिकारी डॉ. पंकज अशिया यांनी अत्यंत सकारात्मक भूमिका घेतली. आपल्या मनोगतात त्यांनी सांगितले की, इंजि. यश शहा व इतर प्रतिनिधींनी मांडलेल्या सर्व मुद्द्यांची नोंद घेण्यात आली असून, जिल्हा स्तरावरील अडचणी तात्काळ सोडवण्यात येतील.शिक्षण विभाग,मौलाना आझाद महामंडळ, पोलीस प्रशासन व संबंधित विभागांना तात्काळ कार्यवाहीचे निर्देश देण्यात आल्याचे त्यांनी स्पष्ट केले. तसेच शासनस्तरावरील प्रश्नांबाबत प्रशासनाकडून सरकारशी पाठपुरावा करण्यात येईल व तिमाही बैठका नियमित घेण्यात येतील, असेही त्यांनी आश्वासन दिले.अतिशय सकारात्मक व सौहार्दपूर्ण वातावरणात ही बैठक पार पडली.यावेळी शिक्षण विभाग, मौलाना आझाद आर्थिक विकास महामंडळ, जिल्हा नियोजन विभाग, अल्पसंख्यांक विभाग, पोलीस प्रशासन, महापालिका प्रशासन, जिल्हा समाज कल्याण विभाग यांसह विविध विभागांचे प्रमुख अधिकारी उपस्थित होते. तसेच अल्पसंख्यांक समाजातील विविध घटकांचे अनेक प्रतिनिधी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
