डोमिसाईलची अट जाचक ठरतेय! घरकुलासाठी ‘रहिवासी प्रमाणपत्र’ स्वीकारा रिपब्लिकन पार्टी ऑफ महाराष्ट्र पक्षाची मनपा प्रशासनाकडे मागणी
छत्रपती संभाजीनगर (दि.१८ डिसेंबर २०२५):-प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत (PMAY) घरकुलासाठी ऑनलाइन अर्ज करताना डोमिसाईल (अधिवास) प्रमाणपत्राची अट अनेक गरजू लाभार्थ्यांसाठी अडथळा ठरत असून, या अटीऐवजी तहसीलदारांनी दिलेले रहिवासी प्रमाणपत्र ग्राह्य धरण्यात यावे, अशी ठाम आणि रास्त मागणी रिपब्लिकन पार्टी ऑफ महाराष्ट्रच्या वतीने करण्यात आली आहे. पक्षाचे जिल्हा प्रमुख दिनेश गवळे यांनी या संदर्भात महानगरपालिका प्रशासनाला निवेदन सादर केले.
निवेदनात नमूद करण्यात आले आहे की, सध्या प्रधानमंत्री आवास योजनेसाठी डोमिसाईल प्रमाणपत्र अनिवार्य करण्यात आले आहे. मात्र, हे प्रमाणपत्र मिळवण्याची प्रक्रिया अत्यंत किचकट, वेळखाऊ आणि सामान्य नागरिकांसाठी त्रासदायक ठरत आहे. विशेषतः ज्या लाभार्थ्यांच्या शालेय सोडल्याच्या दाखल्यावर जन्मस्थळाची नोंद नाही, त्यांना डोमिसाईल प्रमाणपत्र मिळवताना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. परिणामी अनेक पात्र, गरीब व बेघर कुटुंबे केवळ तांत्रिक कारणांमुळे घरकुल योजनेपासून वंचित राहण्याची भीती निर्माण झाली आहे.रिपब्लिकन पार्टी ऑफ महाराष्ट्रच्या वतीने प्रशासनाकडे अशी मागणी करण्यात आली आहे की, सामान्य नागरिकांना योजनेचा लाभ सहजपणे मिळावा यासाठी नियमांमध्ये आवश्यक ती शिथिलता आणण्यात यावी. डोमिसाईल प्रमाणपत्रासाठी लागणारा अनावश्यक विलंब टाळण्यासाठी तहसीलदारांनी निर्गमित केलेले रहिवासी प्रमाणपत्र घरकुल अर्जासाठी ग्राह्य धरल्यास नागरिकांना मुदतीत अर्ज सादर करणे शक्य होईल आणि योजनेचा खरा उद्देश साध्य होईल.
या निवेदनावेळी रिपब्लिकन पार्टी ऑफ महाराष्ट्रचे मराठवाडा उपाध्यक्ष सुनील खरात, जिल्हा उपाध्यक्ष अरशाद लखपती, जिल्हा कार्याध्यक्ष जयनाथ बोर्डे, ज्येष्ठ नेते प्रकाश घोरपडे यांच्यासह पक्षाचे इतर पदाधिकारी उपस्थित होते.प्रशासनाने या मागणीवर सकारात्मक निर्णय घेतल्यास छत्रपती संभाजीनगर शहरातील हजारो बेघर आणि गरजू कुटुंबांना हक्काचे घर मिळण्याचा मार्ग मोकळा होणार असून, प्रधानमंत्री आवास योजनेचा लाभ खऱ्या अर्थाने सर्वसामान्यांपर्यंत पोहोचेल, असा विश्वास यावेळी व्यक्त करण्यात आला.
