वाळू माफियांवर घाव! लौकी शिवारात स्थानिक गुन्हे शाखेची धडक कारवाई; ४.०५ लाखांचा मुद्देमाल जप्त
अहिल्यानगर (दि.१८ डिसेंबर २०२५):-कोपरगाव तालुक्यातील लौकी (ता. कोपरगाव) परिसरात अवैध वाळू उपसा व वाहतुकी विरोधात स्थानिक गुन्हे शाखेने मोठी कारवाई करत वाळू माफियावर कडक घाव घातला आहे.या कारवाईत पोलिसांनी ४ लाख ५ हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला असून, एका आरोपीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलीस अधीक्षक श्री.सोमनाथ घार्गे यांच्या स्पष्ट आदेशानुसार जिल्ह्यातील अवैध वाळू वाहतुकीवर अंकुश आणण्यासाठी स्थानिक गुन्हे शाखेला विशेष कारवाईचे निर्देश देण्यात आले होते.त्या अनुषंगाने स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक श्री.किरणकुमार कबाडी यांनी पथकाची रचना करून अवैध वाळू उत्खनन व वाहतुकीविरोधात मोहिम हाती घेतली.दिनांक १७ डिसेंबर २०२५ रोजी कोपरगाव तालुका पोलीस ठाण्याच्या हद्दीत पथक गस्त घालत असताना, गुप्त बातमीदारामार्फत माहिती मिळाली की रमेश जगन्नाथ मोरे (वय ४२, रा. पढेगाव, ता. कोपरगाव, जि. अहिल्यानगर) हा इसम पुणतांबा चौफुली ते वैजापूर रोडवरून, लौकी गावाच्या शिवारातील खटकडी ओढ्याच्या पात्रातून चोरट्या पद्धतीने वाळू उपसा करून ट्रॅक्टर–ट्रॉलीद्वारे वाहतूक करत आहे.मिळालेल्या माहितीनुसार पथकाने तत्काळ सापळा रचून पेट्रोलिंगदरम्यान समोरून येणाऱ्या ट्रॅक्टर–ट्रॉलीला थांबवून तपासणी केली. तपासणीदरम्यान ट्रॉलीमध्ये वाळू आढळून आली. चालकास ताब्यात घेऊन चौकशी केली असता त्याने वाळू वाहतुकीचा कोणताही शासकीय परवाना नसल्याचे निष्पन्न झाले.
पंचासमक्ष पोलिसांनी ४ लाख रुपये किमतीचा ट्रॅक्टर व ट्रॉली, तसेच ५ हजार रुपये किमतीची अर्धा ब्रास वाळू, असा एकूण ४ लाख ५ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.या प्रकरणी आरोपीविरुद्ध कोपरगाव तालुका पोलीस ठाण्यात गु.र. नं. ३४४/२०२५, बीएनएस २०२३ चे कलम ३०५ (ई) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास कोपरगाव तालुका पोलीस ठाण्याचे अधिकारी करीत आहेत.ही संपूर्ण कारवाई पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस अधिकारी व अंमलदार राहुल द्वारके, भिमराज खर्से, राहुल डोके, प्रमोद जाधव, सतीश भवर, सुनील मालणकर तसेच चालक महादेव भांड यांच्या पथकाने यशस्वीरीत्या पार पाडली.अवैध वाळू माफियांविरोधात पुढेही कठोर कारवाई सुरू राहणार असल्याचा इशारा पोलिस प्रशासनाकडून देण्यात आला आहे.
