उमेद प्रकल्पातून महिलांना नवे पंख..!.मलाला व उत्कर्ष बालभवनात पालक सभा व ४० महिलांना ब्युटी पार्लर प्रशिक्षण प्रमाणपत्रांचा सन्मानसोहळा
अहिल्यानगर (प्रतिनिधी):-महिलांच्या आर्थिक स्वावलंबनाला चालना देणारा आणि विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगतीस बळ देणारा प्रेरणादायी उपक्रम स्नेहालय संचलित मलाला बालभवन व उत्कर्ष बालभवन येथे दिनांक १८ डिसेंबर २०२५ रोजी उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला. उमेद प्रकल्पांतर्गत जनशिक्षण संस्थेच्या शासकीय मान्यताप्राप्त केंद्रातून ब्युटी पार्लर प्रशिक्षण पूर्ण केलेल्या ४० गरजू महिलांना प्रमाणपत्र वितरण, तसेच विद्यार्थ्यांच्या प्रगतीसाठी आयोजित पालक सभा हे या कार्यक्रमाचे मुख्य आकर्षण ठरले.या संयुक्त कार्यक्रमास सखी – वन स्टॉप सखी केंद्राच्या जिल्हा समन्वयक सौ. शबाना युनूस शेख, तसेच रुबीना मॅडम व यास्मिन मॅडम यांची प्रमुख उपस्थिती लाभली. मान्यवरांच्या हस्ते प्रशिक्षणार्थी महिलांना प्रमाणपत्रांचे वितरण करण्यात आले.
कार्यक्रमाची सुरुवात पालक सभेने झाली. यावेळी रजिया दफेदार मॅडम यांनी विद्यार्थ्यांची नियमित उपस्थिती, शिस्त, वेळेचे पालन, अभ्यासातील प्रगती तसेच पालकांची जबाबदारी याविषयी सविस्तर मार्गदर्शन केले. इयत्ता नववी व दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी मलाला बालभवनतर्फे सुरू असलेल्या मार्गदर्शन वर्गांमुळे विद्यार्थ्यांमध्ये आत्मविश्वास वाढत असून शैक्षणिक निकालात सकारात्मक बदल होत असल्याचे त्यांनी अधोरेखित केले. यासोबतच मागील कालावधीत राबविण्यात आलेल्या शैक्षणिक, सामाजिक व कौशल्य विकास उपक्रमांचा आढावाही पालकांसमोर मांडण्यात आला.यानंतर उमेद प्रकल्पांतर्गत आयोजित ब्युटी पार्लर प्रशिक्षण यशस्वीरीत्या पूर्ण केलेल्या महिलांना प्रमाणपत्रांचे वितरण करण्यात आले. यावेळी मार्गदर्शन करताना सौ. शबाना युनूस शेख यांनी Quality Skill विकसित करण्याचे महत्त्व स्पष्ट केले. केवळ प्रशिक्षण नव्हे, तर त्या कौशल्याचा सातत्यपूर्ण वापर, दर्जेदार सेवा आणि आत्मविश्वास यांच्या बळावरच महिलांना आर्थिक स्वावलंबन साध्य करता येते, असे त्यांनी सांगितले.
त्यांनी एम.ए.व्ही.आय.एम. (महिला आर्थिक विकास मंडळ) अंतर्गत चालणाऱ्या बचत गटांची माहिती देत बचत गटांमुळे महिलांना आर्थिक शिस्त, उद्योगासाठी भांडवल, कर्ज सुविधा व सामूहिक ताकद कशी मिळते हे उदाहरणांसह स्पष्ट केले. तसेच वन स्टॉप सखी केंद्रामार्फत मिळणाऱ्या कायदेशीर, सामाजिक व मानसिक सहाय्याची माहितीही महिलांना देण्यात आली.कार्यक्रमादरम्यान महिलांना स्वयंरोजगाराच्या संधी, स्वतःचा पार्लर सुरू करण्यासाठी आवश्यक पावले, उद्यम कार्ड काढण्याची प्रक्रिया, तसेच शॉप ॲक्ट अंतर्गत व्यवसाय नोंदणीसाठी लागणारी कागदपत्रे याविषयी सखोल मार्गदर्शन करण्यात आले. प्रत्यक्ष कागदपत्रे जमा करून घेतल्यामुळे महिलांना शासकीय प्रक्रियेची स्पष्ट माहिती मिळाली.
यावेळी यास्मिन मॅडम यांनी उमेद प्रकल्पांतर्गत उपलब्ध विविध रोजगाराभिमुख योजना, स्वयंरोजगार संधी, बचत गट निर्मिती तसेच महिलांच्या सर्वांगीण विकासासाठी असलेल्या शासकीय योजनांची माहिती दिली. पुढील काळात महिलांसाठी आणखी रोजगाराभिमुख प्रशिक्षण तसेच घरकुल योजनेविषयी माहिती देण्याचे नियोजन असल्याचेही त्यांनी जाहीर केले. कार्यक्रमाची सांगता रुबीना मॅडम यांच्या आभारप्रदर्शनाने झाली.
ही पालक सभा व प्रमाणपत्र वितरण सोहळा केवळ औपचारिक कार्यक्रम न राहता, महिला सक्षमीकरण, आर्थिक स्वावलंबन आणि विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगतीसाठी प्रेरणादायी मंच ठरला. प्रमाणपत्र वितरणामुळे महिलांचा आत्मविश्वास वाढला, तर मार्गदर्शनामुळे त्यांना रोजगार व स्वयंरोजगाराच्या संधींबाबत स्पष्ट दिशा मिळाली. पालकांचा सक्रिय सहभाग, विद्यार्थ्यांविषयी वाढलेली जागरूकता आणि महिलांसाठी उपलब्ध योजना व प्रशिक्षण यांचा समन्वय साधत मलाला व उत्कर्ष बालभवन समाजातील सकारात्मक बदलाचे प्रभावी केंद्र बनत असल्याचे या कार्यक्रमातून ठळकपणे दिसून आले.
स्नेहालय अधिकारी संगीता सानप मो. ७६२०४३१४१३
