“नवी उमेद नवे जीवन नवी आशा” अनाथ व एच.आय.व्ही. बाधित जोडप्यांच्या पुनर्वसनासाठी समाजाने पुढाकार घ्यायलाच हवा पोलीस उपनिरीक्षक विनोद परदेशी
अहिल्यानगर (प्रतिनिधी):-अनाथ,निराधार व समाजाने वाळीत टाकलेल्या व्यक्तींना सन्मानाचे आयुष्य मिळावे,यासाठी समाजाने संवेदनशीलतेने पुढाकार घेणे अत्यंत गरजेचे आहे.याच भावनेतून स्नेहालय संस्थेच्या वतीने आयोजित करण्यात आलेला अनाथ व निराधार जोडप्यांचा सामुदायिक विवाह हा केवळ विवाहसोहळा नसून सामाजिक परिवर्तनाची क्रांतिकारक चळवळ आहे,असे प्रतिपादन एमआयडीसी पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक विनोद अरुणसिंग परदेशी यांनी केले.स्नेहालय संस्थेच्या परिसरात पार पडलेल्या या सामुदायिक विवाह सोहळ्याप्रसंगी ते बोलत होते.यावेळी त्यांनी नवविवाहित जोडप्यांना शुभाशीर्वाद देत,योग्य आहार,नियमित उपचार आणि आरोग्याची काळजी घेण्याचे महत्त्व अधोरेखित केले. समाजासाठी प्रेरणादायी ठरणाऱ्या या अलौकिक उपक्रमाबद्दल त्यांनी स्नेहालय संस्थेचे विशेष शब्दांत कौतुक केले.या कार्यक्रमास अक्षय शिवाजी रोहेकले (पोलीस कॉन्स्टेबल, एमआयडीसी, अहिल्यानगर), शिवाजी जाधव (जिल्हा कार्यक्रम अधिकारी, जिल्हा एड्स प्रतिबंधक व नियंत्रण विभाग) यांची प्रमुख उपस्थिती होती. सर्व मान्यवरांनी नवदाम्पत्यांना भावी आयुष्यासाठी शुभेच्छा दिल्या.
यावेळी स्नेहालयाच्या अध्यक्ष जयाताई जोगदंड,विश्वस्त डॉ. अंशू मुळे,सपना असावा,शिल्पा कामत,संचालक हनिफ शेख, प्रविण मुत्याल,स्नेहाधार प्रकल्पाचे मानद संचालक अॅड. श्याम असावा,तसेच पुणे स्नेहाधारच्या विनोदिनी सातभाई, प्रीती गोडबोले,लता मोहळ, विवेक नारळकर आदी मान्यवर आप्त म्हणून उपस्थित होते.समाजाने वाळीत टाकलेल्या एच.आय.व्ही.संसर्गित व्यक्तींना नवजीवनाची संधी देण्यासाठी स्नेहालय संस्थेच्या वतीने “नवी उमेद – नवे जीवन – नवी आशा” या संकल्पनेतून २ डिसेंबर २०२५ रोजी राज्यस्तरीय वधू-वर परिचय मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते.या मेळाव्यास तब्बल ३०० हून अधिक वधू-वरांनी नोंदणी केली होती.त्यामधून निवडलेल्या दोन जोडप्यांचा विवाह या सामुदायिक विवाह सोहळ्यात मोठ्या उत्साहात व सन्मानाने पार पडला.
या विवाह सोहळ्यात वधूंचे आप्त म्हणून स्नेहालय परिवारासह संवेदनशील नागरिकांनी मोलाची भूमिका बजावली. मा. मंगेश रामचंद्र शेठ व अरुणा मंगेश शेठ तसेच शिल्पा मिलिंद चंदगडकर व मिलिंद चंदगडकर यांच्या हस्ते कन्यादानाचा विधी पार पडला.कार्यक्रमाच्या प्रास्ताविकात स्नेहालयचे संचालक प्रविण मुत्याल यांनी जागतिक एच.आय.व्ही./एड्स सप्ताहाच्या समारोपानिमित्त समाजाने भीती न बाळगता एच.आय.व्ही./एड्सबाबत अधिक सजग आणि संवेदनशील राहण्याचे आवाहन केले. त्यांनी १ ते १५ डिसेंबर २०२५ दरम्यान स्नेहालय, महाराष्ट्र राज्य एड्स नियंत्रण संस्था, जिल्हा एड्स प्रतिबंधक व नियंत्रण विभाग आणि मर्करी फीनिक्स ट्रस्ट यांच्या संयुक्त विद्यमाने राबविण्यात आलेल्या विविध जनजागृती उपक्रमांची सविस्तर माहिती दिली.हा विवाह सोहळा केवळ दोन कुटुंबांची सुरुवात नसून, समाजाने स्वीकार, सहानुभूती आणि माणुसकीचा हात पुढे करण्याचा संदेश देणारा प्रेरणादायी क्षण ठरला.
