भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर राष्ट्रीय गौरवाचा मान! संविधान चौकात भारतीताई धोटेंचा भव्य सत्कार
नागपूर (प्रतिनिधी):-संविधान चौक येथे ३६५ एक परिवार व एक पुष्पहार या संघटनेच्या वतीने भव्य सत्कार समारंभाचे आयोजन करण्यात आले.याच कार्यक्रमात संविधान जागृती विचार मंचच्या वतीनेही सामाजिक कार्यकर्त्या भारतीताई कुंदन धोटे यांचा गौरव करण्यात आला.समाजासाठी केलेल्या उल्लेखनीय व प्रेरणादायी कार्याची दखल घेत त्यांना ‘भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर राष्ट्रीय गौरव पुरस्कार – २०२५’ प्रदान करण्यात आला.
हा मानाचा राष्ट्रीय पुरस्कार ग्लोबल इंटरनॅशनल फाउंडेशन टीम यांच्या वतीने जाहीर करण्यात आला असून, नागपूर जिल्ह्यातील सुभाष नगर, हिंगणा रोड येथील फुले–शाहू–आंबेडकर चळवळीतील सक्रिय सामाजिक कार्यकर्त्या भारतीताई धोटे यांची या पुरस्कारासाठी निवड करण्यात आली आहे. समाजाच्या सर्वांगीण उत्थानासाठी त्यांनी केलेल्या सातत्यपूर्ण कार्यामुळे त्यांचा हा गौरव करण्यात आला.हा पुरस्कार उत्कृष्ट राष्ट्रीय सेवा, सामाजिक उत्थान, नवाचार तसेच समाज upliftment मध्ये दिलेल्या उल्लेखनीय योगदानासाठी प्रदान करण्यात येतो. हा सन्मान केवळ पुरस्कार नसून, उत्कृष्ट व्यक्तिमत्त्व व उल्लेखनीय कार्याची अधिकृत मान्यता असल्याचे प्रमाणपत्रात नमूद करण्यात आले आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांवर आधारित आदर्श समाजनिर्मितीसाठी प्रेरणादायी कार्य करणाऱ्या व्यक्तींना सन्मानित करण्याच्या उद्देशाने हा राष्ट्रीय गौरव पुरस्कार स्थापित करण्यात आला आहे.
समाजात सकारात्मक बदल घडवून आणणाऱ्या कार्याचा गौरव करण्याचा हा एक महत्त्वपूर्ण उपक्रम असल्याचे आयोजकांनी स्पष्ट केले. ग्लोबल इंटरनॅशनल फाउंडेशनचे मुख्य कार्यालय कैलास नगर, मानेवाडा रोड, नागपूर येथे कार्यरत असून, या संस्थेच्या माध्यमातून विविध सामाजिक,शैक्षणिक व जनजागृती उपक्रम राबवले जातात.या राष्ट्रीय गौरव पुरस्कारामुळे समाजकार्य करणाऱ्या कार्यकर्त्यांना नवी ऊर्जा व प्रेरणा मिळत असून, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांचा प्रसार अधिक व्यापक स्तरावर होत असल्याची भावना उपस्थित मान्यवरांनी व्यक्त केली. भारतीताई धोटे यांच्या सन्मानामुळे नागपूर जिल्ह्यातील सामाजिक कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले असून, त्यांच्या पुढील सामाजिक वाटचालीसाठी सर्व स्तरातून शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.
