महापालिका निवडणूक..निवडणुकीपुरते चेहरे नकोत काम करणारे लोकप्रतिनिधी हवेत..निवडणूक आली की पाया अन् निकाल लागला की गायब! उमेदवारांना मतदारांचा सवाल..नगरसेवक निवडताना मतदार राजा आता तरी सजग व्हा..
अहिल्यानगर (प्रतिनिधी):-सध्या महाराष्ट्रात निवडणुकीचे बिगुल वाजले आहे.महानगरपालिकेच्या निवडणुका जाहीर झाल्या की शहरात काही परिचित पण कायमस्वरूपी गायब असलेले चेहरे अचानक सक्रिय होतात. वर्षानुवर्षे नागरिकांच्या प्रश्नांपासून दूर असलेले,गल्लीत न फिरकणारे हेच लोक उमेदवारी मिळताच ‘लोकसेवक’ बनून हात जोडतात, पाया पडतात आणि गोड शब्दांची आतषबाजी सुरू करतात.मात्र निकाल लागल्यानंतर हेच चेहरे पुन्हा कुठे अदृश्य होतात,हा प्रश्न आज प्रत्येक मतदाराच्या मनात आहे.नगरसेवक पदासाठी उभे असलेले अनेक ‘हौस नवसे’ उमेदवार हे केवळ पदाच्या हौसेपोटी निवडणूक रिंगणात उतरलेले दिसतात.ना प्रभागाशी दीर्घकालीन नातं,ना नागरिकांच्या अडचणींचा अभ्यास,ना विकासाचा ठोस आराखडा! फक्त निवडणूक आली की बाहेर पडायचं आणि निकाल लागला की पुन्हा शांत बसायचं—हा प्रकार आता मतदारांनी ओळखला पाहिजे.
मतदान का करावे अशा उमेदवारांना? हा प्रश्नच मुळात मतदारांनी निर्भीडपणे विचारायला हवा.
ज्यांनी पाच वर्षे लोकांमध्ये राहून काम केले नाही,ज्यांनी कधी पाणी,रस्ते,ड्रेनेज,आरोग्य,शिक्षण यांसाठी आवाज उठवला नाही,जे संकटाच्या काळात नागरिकांच्या पाठीशी उभे राहिले नाहीत,अशा उमेदवारांना फक्त निवडणुकीच्या आठवड्यात दिसल्यामुळे मत द्यायचे का?
पाया पडणं म्हणजे लोकसेवा नव्हे
निवडणुकीच्या काळात घरोघरी जाऊन पाया पडणे,मोठमोठी आश्वासने देणे म्हणजे लोकसेवा नव्हे.लोकसेवा म्हणजे निवडणूक नसतानाही लोकांमध्ये असणे, लोकांचे प्रश्न ऐकणे,प्रशासनाकडे सातत्याने पाठपुरावा करणे आणि विकासासाठी झटणे—हेच खरे काम आहे.
मतदार राजा सजग व्हा!
यावेळी मतदारांनी भावनांना नव्हे तर वास्तवाला मत द्यावे.काम करणाऱ्यांना विचारा – तुमचे पाच वर्षांचे काम काय? आश्वासन देणाऱ्यांना विचारा – याआधी काय केले?पाया पडणाऱ्यांना विचारा – निवडणूक नसताना कुठे होता?
महानगरपालिका ही शहराचा कणा आहे.येथे निवडून जाणारा नगरसेवक हा फक्त नावापुरता प्रतिनिधी नसून शहराच्या भवितव्याचा भागीदार असतो. त्यामुळे ‘हौस नवसे’ उमेदवारांना नव्हे,तर खऱ्या अर्थाने काम करणाऱ्या,प्रामाणिक आणि सतत जनतेत राहणाऱ्या प्रतिनिधींनाच मत देण्याची हीच योग्य वेळ आहे.
शब्दांकन किरण शिंदे (नागरिक)
