केडगावमध्ये राजकीय भूकंप…!.शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) गटाचे माजी नगरसेवक अमोल येवले यांचा अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल
केडगाव (प्रतिनिधी):-केडगाव परिसरात आज एक मोठी राजकीय घडामोड घडली असून स्थानिक राजकारणात खळबळ उडाली आहे. मागील पाच वर्षांपूर्वी शिवसेनेच्या चिन्हावर निवडणूक लढवलेले आणि शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) गटाचे माजी नगरसेवक अमोल येवले यांनी आज अधिकृतपणे अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला आहे.या अनपेक्षित निर्णयामुळे केडगावच्या राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले असून, यामागे मोठी राजकीय रणनीती असल्याचे बोलले जात आहे.अमोल येवले हे केडगावमधील एक सक्रिय आणि लोकसंपर्क असलेले नेतृत्व मानले जातात. त्यांच्या अपक्ष उमेदवारीमुळे सर्वच राजकीय पक्षांच्या समीकरणांवर परिणाम होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर माध्यमांशी बोलताना अमोल येवले म्हणाले की, “मी नेहमीच केडगावच्या सर्वसामान्य नागरिकांच्या प्रश्नांसाठी काम केले आहे. पक्षापेक्षा जनतेचा विश्वास माझ्यासाठी महत्त्वाचा आहे. स्थानिक विकास, प्रलंबित प्रश्न आणि नागरिकांच्या अपेक्षा लक्षात घेऊनच हा निर्णय घेतला आहे.”तसेच, “ही लढाई कोणत्याही पक्षाविरुद्ध नसून केडगावच्या विकासासाठी आहे. जनतेने मला याआधी संधी दिली, त्याच विश्वासावर मी पुन्हा मैदानात उतरलो आहे,” असेही त्यांनी स्पष्ट केले.दरम्यान, त्यांच्या या निर्णयामुळे शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) गटासह इतर राजकीय पक्षांची डोकेदुखी वाढली असून, आगामी निवडणुकीत केडगावमध्ये चुरशीची लढत होणार हे निश्चित मानले जात आहे.एकूणच, अमोल येवले यांच्या अपक्ष उमेदवारीने केडगावच्या राजकारणात नवा वळणबिंदू निर्माण झाला असून, पुढील काळात आणखी कोणत्या राजकीय घडामोडी घडतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
