सेवा संवर्धन कार्यशाळांतून सामाजिक संस्थांना नवी दिशा व बळकटी-वीणा गोखले
अहिल्यानगर (प्रतिनिधी):-सेवा संवर्धन कार्यशाळांमुळे छोट्या व मध्यम सामाजिक संस्थांना त्यांच्या कार्यपद्धती अधिक सक्षम करता येतात.अशा संस्थांच्या माध्यमातून समाजविकासात शाश्वत योगदान देणे शक्य होते, असे प्रतिपादन ‘देणे समाजाचे’ या पुणे येथील उपक्रमाच्या संस्थापिका वीणा गोखले यांनी केले.स्नेहालय संस्थेच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या तीन दिवसीय द्वितीय निवासी सेवा संवर्धन कार्यशाळेचे उद्घाटन श्रीमती गोखले यांच्या हस्ते झाले. ‘देणे समाजाचे’ हा उपक्रम मागील दोन दशकांपासून देणगीदार, कार्यकर्ते आणि सामाजिक संस्थांना जोडण्याचे महत्त्वपूर्ण कार्य करीत आहे.
श्रीमती गोखले यांनी सांगितले की, समाजकार्याच्या वाटचालीत स्नेहालयची साथ-सोबत अत्यंत महत्त्वाची ठरली आहे. आतापर्यंत हजारो नवोदित व छोट्या संस्थांना देणगीदार व कार्यकर्ते जोडून त्यांच्या कार्याला योग्य दिशा व बळकटी देण्यात आली आहे. पुण्याप्रमाणेच मुंबई, ठाणे येथे या उपक्रमाचे आयोजन झाले असून, लवकरच कोल्हापूर येथेही ‘देणे समाजाचे’ हा उपक्रम आयोजित केला जाणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.‘जनसंपर्क व्यवस्थापन’ या विषयावरील परिसंवादात रीमा अमरापूरकर, वीणा गोखले आणि स्नेहालयच्या सचिव डॉ. प्रीती भोंबे यांनी संवाद साधला. यावेळी रीमा अमरापूरकर यांनी सोशल मीडियाच्या प्रभावी वापराचे तंत्र-मंत्र उपस्थितांना सांगितले. वीणा गोखले यांनी कंपन्यांकडून मिळणाऱ्या सामाजिक दायित्व निधीसोबतच (सीएसआर) वैयक्तिक देणगीदारांचे महत्त्व अधोरेखित केले.संस्थांच्या छोट्या गरजा व उपक्रम वैयक्तिक देणगीदारांच्या माध्यमातून सहज पूर्ण करता येतात,तसेच या माध्यमातून कार्यकर्तेही मिळू शकतात. त्यासाठी देणगीदारांशी सातत्याने संवाद ठेवणे व नाते जपणे आवश्यक असल्याचे त्यांनी नमूद केले.
कार्यशाळेचे प्रास्ताविक स्नेहालयचे विश्वस्त व आयोजक शशिकांत सातभाई यांनी केले. संस्थेचे कार्याध्यक्ष अनिल गावडे आणि प्रमुख पालक राजीव गुजर यांनी कार्यशाळेची भूमिका व उद्देश स्पष्ट केला.या कार्यशाळेत महाराष्ट्रातील 50 सामाजिक संस्थांचे 86 संस्थापक व त्यांचे सहकारी सहभागी झाले आहेत. भविष्यात अशा प्रकारच्या कार्यशाळांचे आयोजन अधिक मोठ्या प्रमाणावर करण्यात यावे, अशी मागणी सहभागी संस्थांकडून यावेळी करण्यात आली.
