मनपा निवडणुकीत अंधश्रद्धेचा धक्कादायक प्रकार..प्रभाग १० मध्ये ‘लिंबू-डाव’चा आरोप..भाजप कार्यालयाबाहेर जादूटोणा..CCTV फुटेजमुळे राजकीय खळबळ
अहिल्यानगर (प्रतिनिधी):-महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शहरातील प्रभाग क्रमांक १० मध्ये एक धक्कादायक व वादग्रस्त प्रकार समोर आला असून,यामुळे राजकीय वातावरण तापले आहे. प्रभाग क्रमांक दहा मधील भाजपाचे उमेदवार सागर मुर्तुडकर यांच्या शहरातील वंजार गल्ली येथील भाजपच्या कार्यालयाच्या बाहेर त्यांचे विरोधी उमेदवार यांनी कथितरित्या लिंबू-डाव व जादूटोण्याचा प्रकार केल्याचा आरोप मुर्तुडकर यांच्या कार्यकर्त्यांकडून करण्यात आला आहे.हा संपूर्ण प्रकार सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला असून संबंधित व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.व्हिडिओमध्ये काही व्यक्ती भाजप कार्यालयाच्या परिसरात दुचाकी वरून येताना व संशयास्पद हालचाली करताना दिसत असल्याचा दावा केला जात आहे.
या घटनेनंतर भाजप पदाधिकाऱ्यांनी तीव्र संताप व्यक्त करत निवडणुकीत अंधश्रद्धा, जादूटोणा व दहशतीचे राजकारण चालवले जात असल्याचा आरोप केला आहे.लोकशाही प्रक्रियेत अशा प्रकारांना स्थान नसून, यामुळे निवडणुकीची पवित्रता धोक्यात येत असल्याचे भाजपकडून सांगण्यात आले आहे.दरम्यान, हा प्रकार उघडकीस आल्यानंतर प्रभाग १० मध्ये चर्चेला उधाण आले असून मतदारांमध्येही संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले आहे. संबंधित व्हिडिओच्या आधारे चौकशीची मागणी होत असून, प्रशासन व निवडणूक यंत्रणेकडून याची दखल घेतली जाते का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.मनपा निवडणुकीच्या तोंडावर घडलेल्या या कथित घटनेमुळे राजकीय आरोप-प्रत्यारोपांना नवे वळण मिळाले असून, पुढील घडामोडींकडे नगरकरांचे लक्ष केंद्रित झाले आहे.
