परभणी जिल्ह्यात भाजपच्या यशामागे मंत्री मेघना बोर्डीकर यांची निर्णायक भूमिका
परभणी (प्रतिनिधी):-जिल्ह्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये भारतीय जनता पक्षाला मिळालेल्या यशामागे मंत्री मेघना साकोरे-बोर्डीकर यांचे नेतृत्व निर्णायक ठरत असल्याचे चित्र स्पष्ट होत आहे. जिंतूर, सेलू, सोनपेठ आणि पाथरी या नगरपरिषदांमध्ये भाजपने सत्ता मिळवली असून, या विजयाला मेघना बोर्डीकर यांच्या संघटनात्मक कौशल्याची मोठी साथ लाभल्याचे मानले जात आहे.जिंतूर आणि सेलू या दोन्ही नगरपरिषदा जिंतूर-सेलू विधानसभा मतदारसंघात येतात. या ठिकाणी भाजपने निर्विवाद यश मिळवले असून, मेघना बोर्डीकर या या मतदारसंघाच्या आमदार आहेत. विशेष म्हणजे सोनपेठसारख्या ठिकाणी, जिथे पूर्वी भाजपची संघटना कमकुवत होती, तिथेही भाजपने विजय मिळवून आपली ताकद सिद्ध केली आहे. पाथरी येथे युतीच्या माध्यमातून भाजपने सत्ता स्थापन केली.
जिंतूरमध्ये भाजपकडे मुस्लिम मतदारांचा वाढता कल हा चर्चेचा विषय ठरला आहे. स्थानिक पातळीवर हा बदल मेघना बोर्डीकर यांच्या संवादात्मक आणि समन्वयात्मक राजकारणामुळे झाल्याचे सांगितले जाते. हाच कल आता परभणी शहरातही दिसून येत असून, आगामी महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर याला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे.दरम्यान, वर्षानुवर्षे परभणी महानगरपालिकेवर काँग्रेसची सत्ता असूनही अपेक्षित विकास झाला नसल्याच्या तक्रारी नागरिकांकडून होत आहेत. वाहतूक कोंडी, धुळीची समस्या, विद्यार्थ्यांसाठी क्रीडांगणांचा अभाव, रस्ते व नाल्यांची दुरवस्था आणि अस्वच्छता या प्रश्नांमुळे नागरिकांमध्ये असंतोष व्यक्त केला जात आहे.या पार्श्वभूमीवर परभणी महानगरपालिका निवडणुकीत भाजप मंत्री मेघना बोर्डीकर यांच्या नेतृत्वाखाली मैदानात उतरली आहे. जिल्ह्यातील अलीकडील निवडणूक निकाल पाहता, आगामी महानगरपालिका निवडणुकीत मेघना बोर्डीकर यांची भूमिका महत्त्वाची ठरणार असल्याचे राजकीय विश्लेषकांचे मत आहे.
