सावित्रीच्या लेकी एकवटल्या..! राजगृह धम्मिका महिला समितीतर्फे सावित्रीबाई फुले जयंती उत्साहात साजरी
नागपूर (प्रतिनिधी):-राजगृह बहुद्देशीय धम्मिका महिला समितीच्या वतीने शनिवार,दि.३ जानेवारी २०२६ रोजी क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांची १९५ वी जयंती मोठ्या श्रद्धा,उत्साह व वैचारिक वातावरणात साजरी करण्यात आली.या निमित्ताने दि.६ जानेवारी २०२५ रोजी दुपारी २.३० ते सायंकाळी ५.०० वाजेपर्यंत राजगृह विहारात विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.या कार्यक्रमात संविधान जागर लघुनाट्याचा १५० वा प्रयोग सादर करण्यात आला असून,संविधानाचे विचार सर्वसामान्य जनतेपर्यंत,घराघरात व हृदयाघरात पोहोचावेत,हा या उपक्रमामागील मुख्य उद्देश आहे.

कार्यक्रमास नालंदा गाणार (सखी वन स्टॉप सेंटर) या प्रमुख पाहुण्या म्हणून उपस्थित होत्या.कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी वर्षाताई पाटील (गगन भरारी संस्थापक) व प्रस्तावना शोभा वाघमारे (निवृत्त शिक्षिका) यांनी केले असून कार्यक्रमाचे सूत्रसंचालन भारती धोटे यांनी उत्कृष्ट केले.संविधान जागर लघुनाट्याचे लेखक व गीतकार डॉ. एस. एस. जांभूळे, तर दिग्दर्शन डॉ. वीणा राऊत यांनी केले आहे.भारतीय संविधानाचे जनक महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांचा जागर या नाट्यप्रयोगातून करण्यात आला.विशेष म्हणजे “सावित्रीच्या लेकी” यांनी महरून (लाल) व हिरव्या रंगाच्या साड्या परिधान करून उपस्थित होत्या. या कार्यक्रमाच्या माध्यमातून सावित्रीबाई फुले,डॉ.बाबासाहेब आंबेडकर व बुद्ध धम्माच्या विचारांचा जागर करण्यात आला, संपूर्ण परिसर “जयभीम”, “नमो बुद्धाय” आणि “जय संविधान” या घोषणांनी परिसर दुमदुमला.
