श्रीरामपूरच्या माहेश्वरी वाघमोडे चा विज्ञानात झेंडा..जिल्हा विज्ञान स्पर्धेत तालुक्यात प्रथम गुणवत्तेची उज्ज्वल झलक
श्रीरामपूर (वार्ताहर) –जिल्हा विज्ञान अध्यापक संघ, अहिल्यानगर यांच्या वतीने घेण्यात आलेल्या जिल्हा विज्ञान गुणवंत स्पर्धा परीक्षेत श्रीरामपूर तालुक्यातील स्व. सौ. एस. के. सोमैय्या प्राथमिक विद्यामंदिर शाळेची इयत्ता सहावीतील विद्यार्थिनी कु. माहेश्वरी संतोष वाघमोडे हिने आपल्या बुद्धिमत्तेच्या जोरावर केंद्रस्तरीय तसेच तालुकास्तरावर प्रथम क्रमांक पटकावून तालुक्याच्या शैक्षणिक क्षेत्रात मानाचा तुरा रोवला आहे.
विज्ञान विषयातील संकल्पनांचे सखोल आकलन, प्रयोगशील विचारसरणी व सातत्यपूर्ण अभ्यासाच्या बळावर माहेश्वरीने हे घवघवीत यश मिळविले आहे. तिच्या या उल्लेखनीय यशाबद्दल आयोजित करण्यात आलेल्या सन्मान सोहळ्यात आमदार हेमंत ओगले, रयत शिक्षण संस्थेच्या जनरल बॉडी सदस्या मिनाताई जगधने, गटशिक्षणाधिकारी संजीवन दिवे, नगरसेवक रितेश एडके, योगेश जाधव, मुख्याध्यापिका सोनाली पैठणे, विज्ञान अध्यापक संघाचे तालुकाध्यक्ष शशिकांत थोरात व साहेबराव रक्टे यांच्या शुभहस्ते तिचा गौरव करण्यात आला.
विशेष बाब म्हणजे माहेश्वरीने यापूर्वीही डॉ. होमी भाभा बालवैज्ञानिक परीक्षेत उल्लेखनीय यश संपादन करून आपल्या वैज्ञानिक प्रतिभेची चुणूक दाखवली आहे. तिच्या या सातत्यपूर्ण यशामुळे शाळेचा, शिक्षकांचा व पालकांचा अभिमान वाढला असून परिसरातून तिच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.या यशामागे श्रीम. कोमल धुमाळ, वर्गशिक्षक जालिंदर जाधव यांचे मार्गदर्शन तसेच आई-वडिलांचा मोलाचा पाठिंबा लाभला असल्याची भावना माहेश्वरीने व्यक्त केली. भविष्यात वैज्ञानिक क्षेत्रात मोठे यश संपादन करण्याचा तिचा निर्धार अनेक विद्यार्थ्यांसाठी प्रेरणादायी ठरत आहे.
