दहा दिवस वाघासारखे जगायला आलोय..अहिल्यानगरमध्ये शिवसेनेचा एल्गार!मंत्री गुलाबराव पाटलांचा विरोधकांना इशारा
अहिल्यानगर (प्रतिनिधी):-लोकांना वाटत होतं की एकनाथ शिंदे येत नाहीत, गुलाबराव पाटील येत नाहीत. मात्र एकनाथ शिंदे यांनाही दाढी आहे आणि गुलाबराव पाटील यांनाही दाढी आहे.ते प्रत्यक्ष आले नाहीत,तरी त्यांचा पट्टा अहिल्यानगरकरांना जागं करायला आला आहे,असे जोरदार वक्तव्य शिवसेनेचे मंत्री गुलाबराव पाटील यांनी केले. त्यांच्या या आक्रमक भाषणाने अहिल्यानगरच्या राजकारणात खळबळ उडाली.अहिल्यानगरच्या पाणीपुरवठा योजनेवरून थेट आव्हान देताना पाटील म्हणाले,माझं चॅलेंज आहे.अहिल्यानगरची पाणीपुरवठा योजना कोणी मंजूर केली, तर या पठ्यानेच मंजूर केली आहे.” पुढे ते म्हणाले, “पोरं तुम्ही पैदा करायची आणि बारसं आम्ही करायचं, हा धंदा आमचा नाही.” अहिल्यानगर हा शिवसेनेचा बालेकिल्ला असून या भागातून पाच वेळा अनिल भैया र आमदार झाले आहेत,हेही त्यांनी ठामपणे सांगितले.ते पुढे म्हणाले, “आम्ही शंभर दिवस जगायला नाही,तर दहा दिवस वाघासारखे जगायला आलो आहोत.आम्ही सहज आमदार झालो नाही, 302, 307 काय असतं ते आम्हाला माहिती आहे,असा टोला त्यांनी लगावला.ज्याच्यावर साधी केस नाही,तो शिवसैनिक असूच शकत नाही,असे विधानही त्यांनी केले.राज्यातील राजकीय घडामोडींवर भाष्य करताना पाटील म्हणाले, “जर आम्ही उठाव केला नसता,मंत्रीपदाला लाथ मारून बाहेर आलो नसतो, तर तुमची स्थिती काय झाली असती?” ‘50 खोके एकदम ओके’ या वक्तव्या वरूनही त्यांनी टीका करत आपली भूमिका स्पष्ट केली. “आमच्याच मित्राने आमच्याशी लव्ह मॅरेज तोडलं,” अशा शब्दांत त्यांनी युतीच्या अनुभवांवर भाष्य केले.
महिलांना दिल्या जाणाऱ्या दीड हजार रुपयांच्या योजनेवर होणाऱ्या टीकेला प्रत्युत्तर देताना पाटील म्हणाले, “सोन्याचा चमचा घेऊन जन्मलेल्यांना दीड हजाराची किंमत काय कळणार?” राज्यातील प्रत्येक महिलेला जात न पाहता 1500 रुपये दिले जात आहेत, यावर त्यांनी ठामपणे भर दिला.तुम्ही कितीही करा हल्ला, इथे शिवसेनेचा बालेकिल्ला मजबूत आहे,” असा इशारा देत पाटील म्हणाले की,पक्ष किंवा संघटना संपवता येऊ शकतात, मात्र विचार कधीच संपत नाहीत. शिवसेना ही विचारांवर चालणारी संघटना आहे, असे त्यांनी स्पष्ट केले.भाषणाच्या शेवटी त्यांनी शायरीतून विरोधकांवर टोला लगावला—
“आखे होकर बने अंधे तो बिजली गवार के आ जाने,
जिस अंधे को चिराग न मालूम, ओ उजाला क्या जाने,
जिसे लढना ना मालूम, तीर तलवार क्या जाने.”
शहरात सुरू असलेल्या कथित दहशतवादी दडपशाहीवर भाष्य करताना त्यांनी पोलिसांना आवाहन केले की, “आम्हाला दाबू नका. आम्ही चेंडूसारखे आहोत—जेवढे दाबाल,तेवढी उंच उडी घेऊ.” शेवटी स्वतःवरील केसेसचा उल्लेख करत ते म्हणाले, “माझ्यावर 35 केसेस होत्या, त्या ‘आय लव्ह यू’ केसेस होत्या. चोरी,दरोडा, बलात्काराच्या नाहीत; त्या आंदोलनाच्या केसेस आहेत.”गुलाबराव पाटील यांच्या या आक्रमक आणि रोखठोक भाषणामुळे अहिल्यानगरच्या राजकीय वातावरणात मोठी चर्चा रंगली असून,शिवसेनेचा बालेकिल्ला अधिक मजबूत असल्याचा दावा त्यांनी पुन्हा एकदा ठामपणे मांडला आहे.
