मतदानाचा उत्सव..लोकशाहीचा सेल्फी..!मनपा स्वीप समितीचा अनोखा उपक्रम “तू खींच मेरी फोटो” स्पर्धेद्वारे शंभर टक्के मतदानाचा निर्धार
अहिल्यानगर (प्रतिनिधी):-महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक २०२५–२६ मध्ये मतदानाचा टक्का वाढवण्यासाठी आणि लोकशाहीबाबत जनजागृती निर्माण करण्याच्या उद्देशाने अहिल्यानगर महानगरपालिकेच्या स्वीप (Systematic Voters’ Education and Electoral Participation) समितीच्या वतीने “तू खींच मेरी फोटो” या अभिनव व आकर्षक मतदान सेल्फी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. या स्पर्धेमध्ये परिवार, संस्था, संघटना, विविध सामाजिक ग्रुप्स तसेच बचत गटांना मोठ्या प्रमाणावर सहभागी होण्याचे आवाहन करण्यात आले आहे.येणाऱ्या १५ जानेवारी २०२६ रोजी होणाऱ्या मतदान प्रक्रियेच्या पार्श्वभूमीवर प्रत्येक मतदाराने आपल्या घरातील सर्व सदस्यांचे राष्ट्रीय मतदार ओळखपत्र (Voter Card / EPIC) आजच शोधून सज्ज ठेवावे, असे आवाहन मनपा प्रशासनाकडून करण्यात आले आहे. मतदानापूर्वी मतदारांनी ओळखपत्र हातात धरून कुटुंबातील सदस्यांचा ग्रुप फोटो किंवा वैयक्तिक सेल्फी काढायचा आहे. हा फोटो मतदानाबाबत इतर नागरिकांनाही प्रेरणा मिळावी यासाठी स्वतःच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर शेअर करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.तसेच, प्रत्यक्ष मतदानानंतर शाई लावलेले बोट अभिमानाने दाखवत काढलेला सेल्फी देशातील पहिल्या ‘अहिल्यानगर मनपा स्वीप केअर’ या उपक्रमाच्या ८०५५८०९३९४ या व्हॉट्सॲप क्रमांकावर १६ जानेवारी २०२६ पर्यंत पाठवायचा आहे. हा सेल्फी पाठवताना स्वतःचे संपूर्ण नाव नमूद करणे आवश्यक आहे. या उपक्रमात सहभागी होणाऱ्या सर्व मतदारांना व ग्रुप्सना सहभागाचे प्रमाणपत्र देण्यात येणार असून, निवडक सहभागींना विशेष पारितोषिकांनी गौरवण्यात येणार आहे.
“जगातील सर्वात सक्षम लोकशाही असलेल्या भारतामध्ये मनपा निवडणूक हा लोकशाहीचा उत्सव आहे. शहराच्या सशक्त उभारणीसाठी प्रत्येक नागरिकाने हिरीरीने मतदानात सहभागी व्हावे. स्वतःला व समाजाला अभिमान वाटेल असे मतदान करावे,” असे आवाहन निवडणूक अधिकारी तथा मनपा आयुक्त व प्रशासक यशवंत डांगे यांनी केले आहे.दरम्यान,अतिरिक्त आयुक्त विजयकुमार मुंढे, स्वीप नोडल अधिकारी तथा सहाय्यक आयुक्त अशोक साबळे, सहाय्यक आयुक्त सपना वसावा व मेहेर लहारे, उद्यान विभाग प्रमुख शशिकांत नजन, प्रसिद्धी अधिकारी नितीन ब्राह्मणे, प्रशासनाधिकारी जुबेर पठाण तसेच मतदारदूत डॉ. अमोल बागुल यांनीही नागरिकांना या अभिनव “तू खींच मेरी फोटो” उपक्रमात मोठ्या संख्येने सहभागी होऊन शंभर टक्के मतदान करण्याचे आवाहन केले आहे.लोकशाही बळकट करण्यासाठी प्रत्येक मत मोलाचे आहे. मतदानाचा अभिमान सेल्फीतून दाखवत या उपक्रमात सहभागी व्हा आणि अहिल्यानगरच्या लोकशाही उत्सवात आपला सहभाग नोंदवा, असे मनपा स्वीप समितीने स्पष्ट केले आहे.
