मोबाईलच्या विळख्यात अडकत चाललेले बालमन..ज्ञानेश्वर विद्यालयातील माता-पालक मेळाव्यात डॉ.अनघा शिरसाट यांचे परखड मार्गदर्शन
छत्रपती संभाजीनगर (प्रतिनिधी):-बेगमपुरा येथील ज्ञानेश्वर विद्यालयात शनिवार,दि. १७ जानेवारी २०२६ रोजी माता-पालक मेळावा व हळदी-कुंकू समारंभाचे अत्यंत उत्साही व शिस्तबद्ध वातावरणात आयोजन करण्यात आले.या कार्यक्रमात महिलांना मार्गदर्शन करताना विद्यार्थ्यांचे मानसिक आरोग्य,मोबाईलचा अतिवापर आणि त्याचे दुष्परिणाम या विषयांवर सखोल चर्चा करण्यात आली.कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी विद्यालयाच्या मुख्याध्यापिका डॉ. संध्या मोरे मॅडम होत्या.प्रमुख वक्त्या म्हणून डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या (BAMU) मानसशास्त्र विभागातील सहाय्यक प्राध्यापक डॉ.अनघा कैलासचंद्र शिरसाट उपस्थित होत्या.कार्यक्रमाची सुरुवात क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादनाने करण्यात आली.
मोबाईल व सोशल मीडियाचे दुष्परिणाम ठळकपणे मांडले:
“आजची मुले मोबाईल आणि सोशल मीडियाच्या विळख्यात अडकत चालली आहेत.याचा थेट परिणाम त्यांच्या अभ्यासावर, एकाग्रतेवर व मानसिक आरोग्यावर होत आहे,” असे स्पष्ट मत डॉ. अनघा शिरसाट यांनी व्यक्त केले.पालकांनी केवळ मोबाईलवर नियंत्रण न ठेवता, पाल्यांना वेळ देणे, संवाद वाढवणे आणि सकारात्मक छंदांकडे वळवणे अत्यंत गरजेचे असल्याचे त्यांनी सांगितले.तंत्रज्ञानाचा योग्य वापर शिकवणे ही काळाची गरज असल्याचे त्यांनी ठामपणे नमूद केले.
शाळेच्या उपक्रमांना पालकांचा दाद:
पालक प्रतिनिधी सौ. प्राप्ती संदीप चव्हाण आणि सौ. तिवारीताई यांनी शाळेच्या शैक्षणिक प्रगतीबद्दल समाधान व्यक्त करत विविध नाविन्यपूर्ण उपक्रमांचे विशेष कौतुक केले. यावेळी सौ. कुरील व सौ. दाभाडे यांनीही मनोगत व्यक्त करत विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी शाळा घेत असलेल्या प्रयत्नांचे अभिनंदन केले.
स्पर्धा, आनंद आणि संस्कृतीचा संगम:
मकर संक्रांतीनिमित्त आयोजित या कार्यक्रमात माता-पालकांसाठी विविध मनोरंजक स्पर्धा घेण्यात आल्या. उपस्थित महिलांना वाण म्हणून हातरुमाल, तिळगुळ व हळदी-कुंकू देऊन सन्मानित करण्यात आले. कार्यक्रमात ज्येष्ठ शिक्षिका श्रीमती पवार मॅडम व श्रीमती महाजन मॅडम यांचीही विशेष उपस्थिती होती.
यशस्वी आयोजन:
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्रीमती शरयू बोरगावकर यांनी केले. प्रास्ताविक श्रीमती मंगला सुलताने यांनी मांडले, तर आभारप्रदर्शन श्रीमती आरती बिरोटे यांनी केले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी श्रीमती नाझेरा पठाण, श्रीमती हजारे, श्रीमती झिरपे यांच्यासह सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी विशेष परिश्रम घेतले.माता-पालक, शिक्षक व विद्यार्थ्यांच्या सहभागामुळे हा मेळावा ज्ञानवर्धक, प्रेरणादायी आणि संस्मरणीय ठरला.
