खेळाच्या मैदानातून माणुसकी अधिक बळकट करणारा उत्सव SPL २०२६ च्या उद्घाटनातून उमलली स्नेहालय परिवाराची भक्कम एकजूट
अहिल्यानगर (प्रतिनिधी):-सामाजिक बांधिलकीच्या कामात दिवसरात्र झटणाऱ्या स्नेहालय परिवारासाठी आनंद, आपुलकी आणि मानसिक दिलास्याचा क्षण ठरलेल्या स्नेहालय प्रीमियर लीग (SPL–२०२६) या स्पर्धेच्या चौथ्या पर्वाचा उद्घाटन समारंभ शनिवार, दिनांक १७ जानेवारी २०२६ रोजी सकाळी ९ वाजता स्नेहालय पुनर्वसन संकुल, MIDC, अहिल्यानगर येथे अत्यंत उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला.या स्पर्धेचे उद्घाटन मा. ईश्वर अशोक बोरा (सहाय्यक प्रांतपाल – रोटरी जिल्हा ३१३३), मा. सुनील कटारिया (अध्यक्ष, रोटरी क्लब ऑफ अहिल्यानगर सेंट्रल) आणि मा. अमर गुरप (सचिव, रोटरी क्लब ऑफ अहिल्यानगर सेंट्रल) यांच्या हस्ते करण्यात आले.
यावेळी स्नेहालयच्या अध्यक्षा मा. जयाताई जोगदंड, मा. संजय बंदिष्टी, अॅड. मा. श्याम असावा, मा. कांचन पापडेजा, कार्याध्यक्ष मा. अनिल गावडे, संचालक मा. हनीफ शेख तसेच प्रवीण मुत्याल उपस्थित होते.उद्घाटनप्रसंगी बोलताना मा. ईश्वर अशोक बोरा यांनी स्नेहालयच्या कार्यकर्त्यांचे कौतुक करताना सांगितले की, “स्नेहालयसारख्या संस्थेचे कार्य केवळ सेवा देण्यापुरते मर्यादित नाही, तर ते माणुसकी जपण्याचे कार्य आहे. अशा संस्थेतील कार्यकर्त्यांचे खेळासारख्या उपक्रमांमुळे एकमेकांशी आणि समाजाशी नाते अधिक घट्ट होते. मैदानावर निर्माण होणारी संघभावना हीच खरी या कामाची ताकद दाखवते.”
यावेळी मा. सुनील कटारिया आणि मा. अमर गुरप यांनीही आपले विचार व्यक्त करताना सांगितले की, “स्नेहालय म्हणजे केवळ संस्था नाही, तर एक कुटुंब आहे. या कुटुंबातील प्रत्येक सदस्य मैदानावर एकमेकांसाठी खेळताना पाहणे हे अत्यंत प्रेरणादायी आहे.”कार्यक्रमात स्नेहालयच्या अध्यक्षा मा. जयाताई जोगदंड यांनी भावनिक शब्दांत सांगितले की, “स्नेहालयचे कार्यकर्ते हेच या संस्थेचे खरे बळ आहेत. त्यांच्या आनंदासाठी, आरोग्यासाठी आणि मानसिक समतोलासाठी असे उपक्रम आवश्यक आहेत. SPL ही स्पर्धा म्हणजे आपल्या स्नेहालय परिवाराच्या एकजुटीचा उत्सव आहे.”स्नेहालय परिवारातील विविध प्रकल्पांतील कर्मचारी व कार्यकर्त्यांचा सहभाग असलेली ही स्पर्धा केवळ क्रिकेटपुरती मर्यादित न राहता आपुलकी, विश्वास, समज आणि सहकार्य यांचा अनुभव देणारा उत्सव ठरत आहे. मैदानावरची टाळ्यांची दाद, विजयातला आनंद आणि पराभवातली स्वीकारशीलता ही स्नेहालयच्या मूल्यांची सजीव झलक आहे.उद्घाटन समारंभास स्नेहालयचे सर्व प्रकल्पप्रमुख, कर्मचारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. SPL–२०२६ ही स्पर्धा “खेळाच्या मैदानातून माणुसकी अधिक बळकट करणारा” अनुभव देत असून स्नेहालय परिवाराच्या भावनिक नात्यांना अधिक घट्ट करणारी ठरत आहे.
आपली विश्वासू ऋग्वेदी कदम (स्नेहालय)
