राज्यातील २९ महानगरपालिकांतील महापौर आरक्षणावर मोठी हालचाल.. मुंबईत २२ जानेवारीला महत्त्वपूर्ण बैठक
मुंबई (प्रतिनिधी):-राज्यातील २९ महानगरपालिकांमधील महापौर पदाच्या आरक्षणाची सोडत काढण्याबाबत महत्त्वपूर्ण प्रक्रिया सुरू झाली असून,यासंदर्भात लवकरच निर्णय होण्याची शक्यता आहे.महाराष्ट्र शासनाच्या नगर विकास विभागाने याबाबत अधिकृत पत्रक जारी केले आहे.
राज्यातील २९ महानगरपालिकांमधील महापौर पदाचे आरक्षण निश्चित करण्यासाठी आरक्षणाची सोडत काढण्याबाबत मा.राज्यमंत्री (नगर विकास) यांच्या अध्यक्षतेखाली गुरुवार, दिनांक २२ जानेवारी २०२६ रोजी सकाळी ११.०० वाजता मंत्रालय, मुंबई येथील परिषद सभागृहात (६ वा मजला) बैठक आयोजित करण्यात आली आहे.
या बैठकीत महापौर पदासाठी आरक्षणाची सोडत काढण्याची प्रक्रिया राबविण्यात येणार असून, त्यानुसार पुढील कार्यवाही करण्यात येणार आहे. सदर बैठकीस उपस्थित राहून मा. राज्यमंत्री (नगर विकास) महोदयांच्या निर्देशानुसार आवश्यक ती कार्यवाही करण्यात यावी, अशी विनंती संबंधितांना करण्यात आली आहे.महाराष्ट्र शासनाच्या नगर विकास विभागाचे उप सचिव अनिरुद्ध जेवळीकर यांनी हे पत्रक जारी केले असून, याची प्रत माहितीस्तव मा. मुख्यमंत्री महोदयांचे अपर मुख्य सचिव, मा. उप मुख्यमंत्री (नगर विकास/वित्त) यांचे प्रधान सचिव तसेच संबंधित वरिष्ठ सचिव व सहाय्यकांना पाठविण्यात आली आहे.राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या राजकारणाच्या दृष्टीने ही सोडत अत्यंत महत्त्वाची मानली जात असून, महापौर पदाचे आरक्षण कोणत्या प्रवर्गात जाणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
