समाजसेवेचा दीप प्रज्वलित…विधवा-परित्यक्त महिलांच्या सशक्तीकरणासाठी अनीता भोरखडे यांचे मोलाचे योगदान..भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर राष्ट्रीय सेवारत्न पुरस्काराने गौरव
नागपूर (प्रतिनिधी) :- समाजसेवा, सामाजिक बांधिलकी आणि वंचित घटकांच्या सर्वांगीण उत्थानासाठी सातत्याने कार्यरत असलेल्या नागपूर येथील समाजसेविका अनीता जय भोरखडे यांना वैदर्भियनाथ चॅरिटेबल ट्रस्ट यांच्या वतीने ‘भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर राष्ट्रीय सेवारत्न पुरस्कार’ प्रदान करून सन्मानित करण्यात आले. त्यांच्या सामाजिक, मानवतावादी व प्रेरणादायी कार्याची दखल घेत हा मानाचा पुरस्कार देण्यात आला.
वैदर्भियनाथ चॅरिटेबल ट्रस्ट (नोंदणीकृत) यांच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या या भव्य गौरव सोहळ्यात समाजहितासाठी केलेल्या उल्लेखनीय कार्याबद्दल अनीता भोरखडे यांना सन्मानपत्र प्रदान करण्यात आले. समाजातील दुर्लक्षित, गरजू व वंचित घटकांसाठी त्यांनी राबवलेल्या विविध उपक्रमांमुळे अनेकांच्या जीवनात सकारात्मक बदल घडून आले आहेत.सामाजिक, शैक्षणिक तसेच जनजागृतीच्या विविध उपक्रमांद्वारे समाजप्रबोधनाचे कार्य करणाऱ्या अनीता भोरखडे यांनी विशेषतः महिला, गरीब, वंचित आणि दुर्लक्षित घटकांसाठी सातत्याने पुढाकार घेतला आहे. त्यांचे कार्य समाजात प्रेरणादायी ठरत असून सामाजिक परिवर्तनाच्या दिशेने एक नवा आदर्श निर्माण करत आहे.
भारताच्या राज्यघटनेचे शिल्पकार, महामानव भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारधारेतून प्रेरणा घेऊन समता, बंधुता, न्याय आणि मानवमूल्यांचा पुरस्कार करणाऱ्या अनीता भोरखडे यांच्या कार्याचे ट्रस्टच्या वतीने विशेष कौतुक करण्यात आले. त्यांच्या कार्यामुळे समाजात सामाजिक सलोखा, संवेदनशीलता आणि सकारात्मकतेचे वातावरण निर्माण होत असल्याचे यावेळी नमूद करण्यात आले.हा सन्मान स्वीकारताना अनीता भोरखडे यांनी सांगितले की, “हा पुरस्कार म्हणजे माझ्या कार्याची पावती नसून समाजासाठी अधिक जबाबदारीने आणि अधिक जोमाने काम करण्याची प्रेरणा आहे.” वैदर्भियनाथ चॅरिटेबल ट्रस्टच्या या उपक्रमामुळे समाजसेवेच्या क्षेत्रात कार्य करणाऱ्या अनेक कार्यकर्त्यांना योग्य मंच व सन्मान मिळत असून, समाजात सकारात्मक ऊर्जा निर्माण होत असल्याचे चित्र यानिमित्ताने स्पष्ट झाले आहे.
