कॉलेजमध्ये किरकोळ वादाचे हिंसक रूप..विद्यार्थ्यावर चाकू हल्ला नगर तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल..
अहिल्यानगर (प्रतिनिधी):-अहिल्यानगर–चास (ता.अहिल्यानगर) शिवारातील आडसुळ कॉलेजच्या बाहेर विद्यार्थ्यांमधील किरकोळ वादाने अचानक हिंसक वळण घेतल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या घटनेत एका विद्यार्थ्यावर चाकूने वार करण्यात आला असून,तो गंभीर जखमी झाला आहे.प्रशांत दत्तात्रय जाधव (वय १९,रा.सारंगवस्ती,निमगाव वाघा, ता.अहिल्यानगर) असे जखमी विद्यार्थ्याचे नाव आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, कॉलेजच्या बाहेर काही कारणावरून झालेल्या वादातून हा प्रकार घडला.साहिल शेवाळे (रा.वडगाव गुप्ता,ता. अहिल्यानगर) व त्याच्या सोबत असलेल्या दोन अनोळखी मित्रांनी प्रशांत जाधव यांच्यावर हल्ला केल्याचा आरोप आहे.यावेळी साहिलच्या एका साथीदाराने कमरेला लावलेला चाकू काढून प्रशांत जाधव यांच्यावर वार केला. तसेच साहिल शेवाळे आणि त्याच्या दुसऱ्या साथीदाराने फिर्यादीला लाथाबुक्क्यांनी मारहाण केली.हल्ल्यानंतर परिसरात एकच खळबळ उडाली. जखमी अवस्थेत प्रशांत जाधव यांना तातडीने उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले.या घटनेमुळे कॉलेज परिसरात भीतीचे वातावरण पसरले असून,विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे.
या प्रकरणी जखमी प्रशांत जाधव यांनी दिलेल्या फिर्यादीवरून अहिल्यानगर तालुका पोलीस ठाण्यात साहिल शेवाळे व त्याच्या दोन अनोळखी साथीदारांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.पुढील तपास पोलीस अंमलदार जंबे करत असून,आरोपींचा शोध सुरू आहे.कॉलेज परिसरात वाढणाऱ्या अशा घटनांमुळे पालकांसह नागरिकांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत असून,पोलिसांनी कडक कारवाई करावी अशी मागणी होत आहे.
