कोट्यवधींचा ड्रग्ज तस्करीचा पर्दाफाश..अहिल्यानगर पोलीस दल हादरले..ड्रग्ज रॅकेटचा धागा थेट अहिल्यानगर पोलीस दलातील एलसीबीच्या कर्मचाऱ्यापर्यंत चौकशीसाठी ताब्यात
अहिल्यानगर (प्रतिनिधी):-पुणे जिल्ह्यातील शिरूर परिसरात उघडकीस आलेल्या कोट्यवधी रुपयांच्या ड्रग्ज तस्करी प्रकरणाने संपूर्ण पोलीस यंत्रणेत खळबळ उडाली असून,या गंभीर प्रकरणाचे धागेदोरे थेट अहिल्यानगर जिल्हा पोलीस दलातील स्थानिक गुन्हे शाखेतील एका पोलीस कर्मचाऱ्यापर्यंत पोहोचल्याने मोठी खळबळ उडाली आहे.या कर्मचाऱ्याला पुणे ग्रामीण स्थानिक गुन्हे शाखेने (एलसीबी) ने चौकशीसाठी ताब्यात घेतले आहे.पुणे ग्रामीण पोलीस आणि शिरूर पोलीस ठाण्याच्या पथकाने केलेल्या संयुक्त कारवाईत शिरूर शहरात ९ किलोपेक्षा अधिक वजनाचे मेफेड्रोन (एमडी) अमली पदार्थ जप्त करत एका संशयिताला अटक करण्यात आली होती.
या कारवाई दरम्यान ड्रग्ज विक्रीसाठी वापरले जाणारे वाहन तसेच इतर साहित्यही जप्त करण्यात आले होते.भारत सरकारच्या नशामुक्त भारत अभियानाच्या पार्श्वभूमीवर पुणे ग्रामीण जिल्ह्यात अमली पदार्थां विरोधात कठोर कारवाई करण्याचे आदेश पोलीस अधीक्षक संदीप सिंह गिल यांनी दिले होते.त्यानुसार १७ जानेवारी रोजी स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने शिरूर परिसरात गस्त घालत असताना ही मोठी कारवाई केली.अटक करण्यात आलेल्या आरोपीकडून चौकशी दरम्यान मिळालेल्या माहितीतून,या ड्रग्ज तस्करी प्रकरणाचे धागेदोरे अहिल्यानगर जिल्हा पोलीस दलातील एका कर्मचाऱ्याशी थेट संबंधित असल्याची गंभीर बाब समोर आली आहे.संबंधित पोलीस कर्मचारी अहिल्यानगर पोलीस अधीक्षक कार्यालयातील एका शाखेत कार्यरत असल्याचे निष्पन्न झाले आहे.या पार्श्वभूमीवर पुणे ग्रामीण एलसीबीने सोमवारी (२० जानेवारी) रात्री संबंधित पोलीस कर्मचाऱ्याला ताब्यात घेऊन चौकशी सुरू केली आहे. ड्रग्ज तस्करीसारख्या गंभीर गुन्ह्यात पोलीस दलातीलच कर्मचाऱ्याचे नाव पुढे आल्याने अहिल्यानगर जिल्हा पोलीस दलात एकच खळबळ उडाली आहे.दरम्यान,या प्रकरणात संबंधित पोलीस कर्मचाऱ्याची नेमकी भूमिका काय होती, आरोपीशी त्याचे आर्थिक व संपर्कातील व्यवहार, तसेच संपूर्ण ड्रग्ज नेटवर्कमध्ये त्याचा सहभाग कितपत होता,याबाबत सखोल तपास सुरू असल्याची माहिती सूत्रांनी दिली.पुढील तपासात आणखी धक्कादायक बाबी उघड होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
