वाळू माफियांना जबरदस्त हादरा..! स्थानिक गुन्हे शाखेच्या कारवाईत ८२ लाखांचा मुद्देमाल जप्त
अहिल्यानगर (प्रतिनिधी):-जिल्ह्यात वाढत चाललेल्या अवैध वाळू उपसा व वाहतुकी विरुद्ध कठोर भूमिका घेत स्थानिक गुन्हे शाखेने मोठी कारवाई करत मिरजगाव व खर्डा पोलीस स्टेशन हद्दीत दोन वेगवेगळ्या कारवायांमध्ये तब्बल ८२ लाख ४० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.या प्रकरणी चार आरोपीं विरोधात गुन्हे दाखल करण्यात आले असून काही आरोपी फरार आहेत.
पोलीस अधीक्षक श्री.सोमनाथ घार्गे यांनी जिल्ह्यातील अवैध वाळू वाहतुकी विरुद्ध प्रभावी कारवाईचे आदेश स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक श्री. किरणकुमार कबाडी यांना दिले होते.त्या अनुषंगाने त्यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक समीर अभंग, पोलीस अंमलदार ह्रदय घोडके, बिरप्पा करमल,श्यामसुंदर जाधव,भाऊसाहेब काळे व अमोल कोतकर यांचे विशेष पथक तयार करण्यात आले.
मिरजगाव पोलीस ठाणे हद्दीतील कारवाई
दिनांक २० जानेवारी २०२६ रोजी पथक मिरजगाव पोलीस ठाणे हद्दीत अवैध वाळू उत्खननाबाबत माहिती घेत असताना, गुप्त बातमीदाराकडून नागापुर गावच्या शिवारातील नदीपात्रात जेसीबी व ट्रॅक्टर ट्रॉलीच्या सहाय्याने चोरीचा वाळू उपसा सुरू असल्याची माहिती मिळाली.पथकाने तात्काळ छापा टाकला असता, दोन जेसीबीच्या साह्याने तीन ट्रॅक्टर ट्रॉलींमध्ये गौण खनिज वाळू भरली जात असल्याचे आढळून आले.पोलीस येताच काही इसम पळून गेले, तर घटनास्थळी असलेल्या संदीप अशोक जाधव (वय 27, रा. खडकत, ता. आष्टी, जि. बीड),नितीन केरबा कापरे (वय 31, रा. नागलवाडी, ता. कर्जत),अलम निजामुद्दीन शेख (वय 30, मुळ रा. उत्तर प्रदेश, सध्या रा. नागलवाडी) यांना ताब्यात घेण्यात आले.तपासात दोन ट्रॅक्टर चालक अजय खेडर व ऋषिकेश खेडकर (रा.सांगवी,ता.आष्टी,जि. बीड) फरार असल्याचे समोर आले.तसेच दोन जेसीबीचे मालक संभाजी बाबुराव बांदल व धनंजय बांदल (रा.नागलवाडी,ता. कर्जत) हेही फरार असल्याचे निष्पन्न झाले.आरोपींकडे वाळू वाहतुकीचा कोणताही परवाना नसल्याचे स्पष्ट झाले.
या कारवाईत
दोन जेसीबी – ₹50,00,000/-
तीन ट्रॅक्टर ट्रॉली – ₹24,00,000/-
3 ब्रास वाळू – ₹30,000/-
असा एकूण ₹74,30,000/- किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.या प्रकरणी मिरजगाव पोलीस ठाणे गुन्हा र. नं. 18/2026 अन्वये भारतीय न्याय संहिता 2023 चे कलम 303(2) व पर्यावरण कायदा 3/15 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
खर्डा पोलीस ठाणे हद्दीतील कारवाई
यानंतर दि.२१ जानेवारी २०२६ रोजी पहाटे, खर्डा पोलीस ठाणे हद्दीत खर्डा ते भुम रोडवर अवैध वाळू वाहतूक होणार असल्याची माहिती मिळाल्यानंतर खर्डा बसस्थानकाजवळ सापळा रचण्यात आला. संशयित ट्रॅक्टर अडवून चालक योगेश अण्णा सुरवासे (वय 28, रा. खर्डा, ता. जामखेड) याला ताब्यात घेण्यात आले.
या कारवाईत
ट्रॅक्टर ट्रॉली – ₹8,00,000/-
1 ब्रास वाळू – ₹10,000/-
असा ₹8,10,000/- किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.या प्रकरणी खर्डा पोलीस ठाणे गुन्हा र. नं. 09/2026 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
एकूण कारवाई
मिरजगाव व खर्डा हद्दीत केलेल्या या दोन्ही कारवायांतून स्थानिक गुन्हे शाखेने एकूण ₹82,40,000/- किमतीचा मुद्देमाल हस्तगत केला असून, अवैध वाळू धंद्याविरोधात पुढेही सातत्याने कठोर कारवाई सुरू राहणार असल्याचे पोलिसांकडून स्पष्ट करण्यात आले आहे.ही संपूर्ण कारवाई पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेच्या अधिकाऱ्यांनी यशस्वीपणे पार पाडली.
