स्व.दिगंबर (महाराज) ढवण यांना श्रद्धांजली ठरलेली निवड.. भारतीय जनता पार्टीच्या नगरसेविका शारदा ढवण भाजपाच्या गटनेत्या
अहिल्यानगर (प्रतिनिधी/दि.२१ जानेवारी):-अहिल्यानगर महापालिकेच्या राजकीय इतिहासात मंगळवारचा दिवस सुवर्णाक्षरांनी नोंदवला जाणार आहे.भारतीय जनता पार्टीच्या नगरसेवक गटनेतेपदी प्रभाग क्रमांक एक मधून निवडून आलेल्या नगरसेविका शारदा दिगंबर ढवण यांची एकमताने निवड करण्यात आली आहे.ही निवड नाशिक येथे पार पडलेल्या गटनोंदणी प्रक्रिये दरम्यान करण्यात आली असून यावेळी शारदा ढवण यांच्यासह भाजपचे सर्व नगरसेवक उपस्थित होते.
अहिल्यानगर महापालिकेत भाजपचे एकूण २५ नगरसेवक निवडून आले असून,सर्व नगरसेवकांचा विश्वास आणि पाठिंबा शारदा ढवण यांना मिळाला आहे.त्यामुळे भाजपच्या गटनेतेपदी त्यांची निवड केवळ औपचारिक न राहता,पक्षातील एकजुटीचे प्रतीक ठरली आहे.अहिल्यानगरचे नामांतर झाल्यानंतर धनगर समाजाला मिळालेले हे सर्वोच्च राजकीय पद असल्याने या निवडीला विशेष सामाजिक महत्त्व प्राप्त झाले आहे.तसेच ही निवड स्वर्गीय दिगंबर ढवण यांना श्रद्धांजली म्हणून पाहिली जात असून त्यांच्या कार्याचा वारसा पुढे नेण्याचा निर्धार यातून व्यक्त होत आहे.विशेष म्हणजे,अहिल्यानगर महानगरपालिकेत भारतीय जनता पार्टीकडून एका महिलेला प्रथमच गटनेतेपदाची संधी देण्यात आली आहे.त्यामुळे महिलांना नेतृत्वाच्या संधी देण्याच्या भाजपच्या भूमिकेचे हे ठोस उदाहरण मानले जात आहे.
शारदा ढवण यांच्या निवडीमुळे महापालिकेतील भाजपची भूमिका अधिक प्रभावी होणार असून,विकासकामे, प्रशासनावर अंकुश आणि नागरिकांच्या प्रश्नांना वाचा फोडण्यासाठी पक्ष अधिक ताकदीने पुढे येईल, असा विश्वास भाजपच्या नगरसेवकांनी व्यक्त केला आहे.एकूणच,शारदा ढवण यांची गटनेतेपदी निवड ही राजकीय,सामाजिक आणि भावनिक अशा तिन्ही अंगांनी ऐतिहासिक ठरत असून, अहिल्यानगर महापालिकेतील पुढील राजकीय घडामोडींवर तिचा निश्चितच परिणाम दिसून येणार आहे.
