⚠️वाहतूक पोलिस कार्यालयासमोरच नियमांची पायमल्ली;काही तासांत ११४ वाहनचालकांवर शहर वाहतूक शाखेची कठोर कारवाई
अहिल्यानगर (प्रतिनिधी):-राज्यभर सध्या रस्ता सुरक्षा अभियान 2026 प्रभावीपणे राबविण्यात येत असून,या अंतर्गत वाहतूक पोलिसांकडून वाहनचालकांना नियमांचे मार्गदर्शन तसेच नियम मोडणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई केली जात आहे.मात्र,या अभियानाचा अहिल्यानगर शहरातील नागरिकांवर कितपत परिणाम होतो आहे,असा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.
दि.20 जानेवारी 2026 रोजी शहरातील पत्रकार चौक येथे ही मोहीम राबविण्यात आली.विशेष म्हणजे याच चौकात शहर वाहतूक पोलिसांचे मुख्य कार्यालय आहे.शहरातील कोणत्याही दिशेने येणाऱ्या वाहनांना या कार्यालयासमोरूनच जावे लागते.असे असतानाही, येथून जाताना अनेक वाहनचालक सर्रास वाहतूक नियमांचे उल्लंघन करत असल्याचे वास्तव या कारवाईतून पुन्हा एकदा समोर आले.वाहतूक शाखेचे पोलीस निरीक्षक बाबासाहेब बोरसे यांच्या नेतृत्वाखाली पोसई.शमुवेल गायकवाड,पोउनी.रवींद्र घायतडक,पोउनी.मन्सूर सय्यद, पोलीस अंमलदार संजय घोरपडे, गणपत कर्डिले,विष्णू खेडकर,विनायक कांबळे,अमोल घंगाळे,ज्ञानेश्वर खराडे,बाप्पू उंडे, अजय जपकर,मधुकर ससे, वार्डन,संदीप शेंडगे,दिशान शेख, सुभाष गावडे,महेश घोरपडे यांनी पत्रकार चौकात नाकाबंदी करत तपासणी सुरू केली.अवघ्या काही तासांतच तब्बल 114 वाहनचालक वाहतूक नियम मोडताना आढळून आले.
या कारवाईत
▶️सिट बेल्ट न लावता वाहन चालविणारे – 5
▶️काळी काच लावलेली वाहने – 2
▶️मोबाईलवर बोलत वाहन चालविणारे – 5
▶️विना लायसन्स वाहनचालक – 1
▶️विना नंबर प्लेट वाहने – 23
▶️ड्रंक अँड ड्राईव्ह – 3
▶️फटाका सायलेन्सर – 2
▶️इतर मोटार वाहन कायद्यानुसार – 73
अशा एकूण 114 केसेस दाखल करण्यात आल्या.
या कारवाईतून 8,800 रुपये रोख दंड वसूल करण्यात आला असून,याशिवाय 69,500 रुपयांचा अनपेड दंड वसूल करण्यात आला आहे.दररोज अशाच प्रकारची अनेक वाहने वाहतूक पोलिसांच्या कार्यालयासमोरून बिनधास्तपणे जात असल्याचे चित्र असून,ना केवळ मार्गदर्शनामुळे सुधारणा होत आहे,ना दंडात्मक कारवाईचा फारसा धाक राहिलेला दिसून येतो. त्यामुळे “आम्ही असे नाही सुधारणार…” अशीच मानसिकता शहरातील अनेक वाहनचालकांची बनत चालली आहे का,असा प्रश्न उपस्थित होत आहे.रस्ता सुरक्षा अभियान केवळ मोहिमेपुरते न राहता,नागरिकांच्या मानसिकतेत बदल घडवून आणण्यासाठी अधिक कठोर अंमलबजावणीची गरज असल्याची भावना सुज्ञ नागरिकांमधून व्यक्त होत आहे.
