महिलास क्षमीकरणाची नवी ओळख..योगिता रूपवते यांचे आर्थिक नियोजन प्रशिक्षण यशस्वी..अधिकृत प्रमाणपत्राने गौरव
अहिल्यानगर (प्रतिनिधी):-महिलांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्याच्या उद्देशाने महाराष्ट्र शासनाच्या महिला व बाल विकास विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या आर्थिक नियोजन प्रशिक्षण कार्यक्रमात संगमनेर येथील समनापूर (सुदूबाबावाडी,अंगणवाडी) मधील योगिता संतोष रूपवते यांनी यशस्वी सहभाग नोंदवत प्रशिक्षण पूर्ण केले आहे.या उल्लेखनीय यशाबद्दल त्यांना अधिकृत प्रमाणपत्र प्रदान करण्यात आले आहे.सदर प्रशिक्षण कार्यक्रम महिला व बाल विकास विभाग,महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने आयोजित करण्यात आला होता.या कार्यक्रमाअंतर्गत महिलांना आर्थिक साक्षरता, आर्थिक नियोजन,बचत, उत्पन्न-वाढीचे मार्ग,तसेच वैयक्तिक व कौटुंबिक अर्थकारणाचे नियोजन याबाबत सखोल मार्गदर्शन करण्यात आले.
योगिता संतोष रूपवते यांनी हे प्रशिक्षण दि.8 जानेवारी 2025 ते 19 जानेवारी 2026 या कालावधीत यशस्वीरीत्या पूर्ण केले.प्रशिक्षण पूर्ण केल्याबद्दल त्यांना Omega Systems यांच्या मार्फत अधिकृत प्रमाणपत्र प्रदान करण्यात आले असून, सदर प्रमाणपत्रावर प्रकल्प संचालक योगेश यादवकर यांची स्वाक्षरी आहे.या प्रशिक्षणामुळे योगिता रूपवते यांना आर्थिक व्यवहार,बचत गट,आर्थिक नियोजन व आत्मनिर्भरतेकडे वाटचाल करण्यासाठी आवश्यक ज्ञान प्राप्त झाले असून,याचा लाभ भविष्यात त्यांच्या कुटुंबासह परिसरातील इतर महिलांनाही होणार आहे. ग्रामीण भागातील महिलांसाठी असे प्रशिक्षण प्रेरणादायी ठरत असून, महिला सक्षमीकरणाच्या दिशेने हे एक महत्त्वाचे पाऊल मानले जात आहे.योगिता रूपवते यांच्या या यशाबद्दल समनापूर परिसरातून त्यांचे अभिनंदन होत असून, त्यांच्या पुढील वाटचालीसाठी शुभेच्छांचा वर्षाव केला जात आहे.
