आई-वडिलांना मारून टाकण्याची धमकी देताच भाच्याने मामाचा केला निर्घृण खून..सलग १५ दिवसांचा तपास अन् अखेर आरोपी एलसीबी कडून गजाआड
अहिल्यानगर (प्रतिनिधी):-कर्जाच्या वादातून रक्ताच्या नात्यालाच काळीमा फासणारी धक्कादायक घटना कर्जत तालुक्यातील शिंदा (भाळावस्ती) येथे उघडकीस आली असून,भाच्यानेच आपल्या मामाचा निर्घृण खून केल्याचा प्रकार स्थानिक गुन्हे शाखा, अहिल्यानगर यांनी अवघ्या १५ दिवसांत उकल केला आहे.या यशस्वी तपासामुळे परिसरात खळबळ उडाली आहे.दि.06 जानेवारी 2026 रोजी पहाटेच्या सुमारास हनुमंत गोरख घालमे (वय 35, रा. भाळावस्ती, शिंदा,ता.कर्जत,जि. अहिल्यानगर) हे त्यांच्या राहत्या घरी झोपलेले असताना अज्ञात आरोपीने त्यांच्या डोक्यावर टणक हत्याराने वार करून त्यांची हत्या केल्याची घटना उघडकीस आली होती.या प्रकरणी कर्जत पोलीस ठाण्यात गु.र.नं. 09/2026, भारतीय न्याय संहिता 2023 चे कलम 103(1) अन्वये खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता.खुना सारख्या गंभीर गुन्ह्यानंतर अपर पोलीस अधीक्षक श्री.वैभव कलुबर्मे व पोलीस निरीक्षक श्री. किरणकुमार कबाडी (स्थानिक गुन्हे शाखा, अहिल्यानगर) यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली.गुन्हा उघडकीस आणण्यासाठी दोन स्वतंत्र पथके गठीत करण्यात आली.या पथकांमध्ये पोउपनि.समीर अभंग,पोलीस अंमलदार हृदय घोडके,दीपक घाटकर,लक्ष्मण खोकले,भीमराज खरसे,गणेश लबडे,फुरकान शेख,शामसुंदर जाधव,भाऊसाहेब काळे,अमोल कोतकर,मनोज साखरे,प्रशांत राठोड,अर्जुन बडे,चंद्रकांत कुसळकर,महिला पोलीस अंमलदार भाग्यश्री भिटे,ज्योती शिंदे यांच्यासह स्थानिक गुन्हे शाखेतील अनुभवी अधिकारी व अंमलदारांचा समावेश होता.
घटनास्थळी मिळालेल्या पुराव्यांच्या आधारे,आरोपीची कार्यपद्धती,व्यावसायिक कौशल्य व पार्श्वभूमी लक्षात घेऊन सलग १५ दिवस कसून तपास करण्यात आला.तपासा दरम्यान मयताचे आर्थिक व्यवहार व पूर्वीचे वाद तपासले असता,गुप्त बातमीदारामार्फत मयत हा वेळोवेळी आपल्या भाच्याकडे पैशांची मागणी करत असल्याची माहिती पुढे आली.त्यानुसार संशय बळावल्याने तेजस रामदास अनभुले (वय 21,रा.घुमरी, ता. कर्जत) यास ताब्यात घेण्यात आले.सखोल चौकशीत त्याने गुन्ह्याची कबुली दिली.मयत मामा हनुमंत घालमे याच्यावर मोठ्या प्रमाणात कर्ज असल्याने तो वारंवार पैशांची मागणी करत होता.याआधी आरोपी व त्याच्या आई-वडिलांनी मयतास वेळोवेळी पैसे दिले होते.मात्र पुन्हा १० लाख रुपयांची मागणी केल्यानंतर आरोपीच्या आई-वडिलांनी पैसे देण्यास नकार दिला. यावरून संतप्त झालेल्या मयताने आरोपी व त्याच्या कुटुंबीयांना जिवे मारण्याची धमकी दिल्याचा आरोप आहे. या भीती व तणावातूनच आरोपी तेजस अनभुले याने टणक वस्तूने मामाच्या डोक्यावर वार करून त्यांचा खून केल्याची माहिती तपासात निष्पन्न झाली.
ताब्यात घेण्यात आलेल्या आरोपीस पुढील तपासासाठी कर्जत पोलीस ठाण्यात हजर करण्यात आले असून, गुन्ह्याचा पुढील तपास कर्जत पोलीस करीत आहेत.ही संपूर्ण कारवाई पोलीस अधीक्षक श्री.सोमनाथ घार्गे यांच्या सूचना व मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखा, अहिल्यानगर येथील अधिकारी व अंमलदारांनी अत्यंत कौशल्याने पार पाडली असून,अवघ्या १५ दिवसांत खुनाचा छडा लावल्याने पोलिसांच्या कार्यक्षमतेचे सर्वत्र कौतुक होत आहे.
