निमगाव खैरी जिल्हापरिषद शाळेत देशभक्तीचा जल्लोष ७७ वा प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा
श्रीरामपूर (वार्ताहर):-श्रीरामपूर तालुक्यातील निमगाव खैरी येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत भारताचा ७७ वा प्रजासत्ताक दिन अत्यंत उत्साह, शिस्त आणि देशभक्तीच्या वातावरणात साजरा करण्यात आला. या प्रसंगी वीरपत्नी श्रीमती सुवर्णा दत्तात्रय दरेकर यांच्या शुभहस्ते ध्वजारोहण करण्यात आले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ज्येष्ठ नागरिक वेणूनाथ कालंगडे हे होते.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक शाळेचे मुख्याध्यापक संतोष वाघमोडे यांनी केले. शाळेचे माजी विद्यार्थी व जलसंपदा विभागाचे अधिकारी नेताजी विलास शेजूळ यांनी प्रमुख मार्गदर्शन करताना जिल्हा परिषद शाळांमध्ये दर्जेदार शिक्षण दिले जात असून येथील विद्यार्थी भविष्यात विविध क्षेत्रांत यशस्वी होत असल्याचे प्रतिपादन केले. तसेच पालकांनी आपल्या पाल्यांचे शिक्षण जिल्हा परिषद शाळेतूनच घ्यावे, असे आवाहन त्यांनी केले.
या कार्यक्रमास गावचे सरपंच दत्तात्रय झुराळे, उपसरपंच विजयसिंग परदेशी, ग्रामपंचायत सदस्य सुरेश कालंगडे, भाऊसाहेब पंडित, पुंजाराम बत्तीसे, चांगदेव कालंगडे, मेजर बाळासाहेब भागडे, ग्रामसेवक उंडे, जलसंपदा अधिकारी नेताजी विलास शेजूळ, शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष गणेश तरस, उपाध्यक्षा सोनाली महेंद्र साबळे यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.
कार्यक्रमाची सुरुवात प्रभातफेरीने झाली. प्रभातफेरीत विद्यार्थ्यांचे लेझीम पथक विशेष आकर्षण ठरले. गावातील प्रत्येक घरासमोर काढलेल्या रांगोळ्यांनी प्रभातफेरीचे जल्लोषात स्वागत करण्यात आले. विद्यार्थ्यांनी देशभक्तीपर गीतांवर सादर केलेली कवायत, मनोरे, योगासने, सुंदर नृत्यप्रकार तसेच इंग्रजी भाषणे आणि शाळेची आकर्षक सजावट उपस्थितांचे विशेष लक्ष वेधून घेत होते.यावेळी उपस्थितांनी साक्षरतेची प्रतिज्ञा घेतली. विविध स्पर्धांमध्ये यश मिळवलेल्या विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाच्या उत्कृष्ट नियोजनाबद्दल ग्रामस्थांनी शिक्षकांचे विशेष कौतुक केले. यावेळी उपस्थितांनी बक्षिसांच्या स्वरूपात ७,६०० रुपयांची देणगी तसेच विद्यार्थ्यांसाठी खाऊ दिला. योगेश जाधव यांनी शाळेस १,००० रुपये किमतीच्या दोन चटया भेट दिल्या.
कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी मुख्याध्यापक संतोष वाघमोडे, प्रतिभा तोरणे, मिना निकम आणि सुधा गमे यांनी विशेष परिश्रम घेतले.कार्यक्रमास दत्तात्रय झुराळे, विजयसिंग परदेशी, महेंद्र साबळे, मोहन नानेकर, प्रविण पठारे, पंढरीनाथ निमसे, अजय केदारे, अक्षय पंडित, अनिल आगलावे, स्वाती झुराळे, राधाबाई निमसे, भीमबाई जीवरख, भामाबाई धुळगंड, मीराबाई साबळे, संगिता काळे, कमल जोजे, जयश्री भागडे, अर्चना जिवरख, शोभा धुळगंड, आशाबाई परदेशी, जयश्री पंडित, अर्चना पंडित, अनिता काजळे, बेबीताई ढोबळे, वैशाली आगलावे, ज्योती रोहोम, योगेश्वरी काळे, अर्चना भागडे, लता धुळगंड, आरती काळे, ललिता बत्तीसे, योगिता मंडलिक, सुनिता सदाफळ, अश्विनी आंबरे, नंदिनी साठे, सना शेख, शिवानी काकडे, कोमल शेटे, सुनंदा कालंगडे, अनिता निमसे, भारती गवळी, प्राजक्ता दुशिंग, छाया धुळगंड, शोभा खरात, अनिता झुराळे, पूजा निमसे, आरती निमसे आदी पालक व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
