श्री क्षेत्र खंडोबा देवगड येथे भव्य यात्रा उत्सवाचे आयोजन..राज्यातील सर्वात मोठे अश्वप्रदर्शन अश्वप्रेमींसाठी ठरणार पर्वणी
संगमनेर (नितीनचंद्र भालेराव):- प्रति जेजुरी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या श्री क्षेत्र खंडोबा देवस्थान ट्रस्ट, हिवरगाव पावसा (ता. संगमनेर) यांच्या वतीने माघ पौर्णिमेच्या निमित्ताने भव्य यात्रा उत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. राष्ट्रसंत गाडगे महाराज यांच्या पदस्पर्शाने पावन झालेली ही भूमी तसेच आद्यनृत्यांगणा पवळा भालेराव हिवरगावकर यांच्या समृद्ध कलावारशाने नटलेली हिवरगाव पावसा ही कला नगरी यात्रा उत्सवाच्या निमित्ताने पुन्हा एकदा भक्ती, कला व संस्कृतीच्या रंगात रंगणार आहे.
या यात्रा उत्सवानिमित्त कला, क्रीडा, कृषी, सांस्कृतिक व धार्मिक कार्यक्रमांची रेलचेल असणार असून राज्यभरात प्रसिद्ध असलेली भव्य अश्वस्पर्धा, पशुपक्षी प्रदर्शन व अश्वबाजाराचे आयोजन करण्यात आले आहे. देशभरातून अनेक अश्वमालक उच्च प्रतीचे अश्व घेऊन येथे दाखल होणार असून या स्पर्धेला राज्यभर मोठा लौकिक प्राप्त झाला आहे.खंडोबा देवस्थान ट्रस्ट हिवरगाव पावसा यांचा माघ पौर्णिमा यात्रा उत्सव रविवार दि. १ फेब्रुवारी ते सोमवार दि. २ फेब्रुवारी, असे दोन दिवस साजरा होणार आहे. यात्रेची सुरुवात शनिवारी रात्री देवाची काठी व भव्य-दिव्य पालखी छबिना मिरवणुकीने होणार आहे. रविवारी सकाळी ७ ते ७.३० वाजता ग्रामदैवत हनुमान मंदिरात ग्रामदैवत पूजन, सकाळी ८ ते ९ वाजता सवाद्य काठी-पालखी मिरवणूक खंडोबा मंदिरापर्यंत, तर सकाळी ९ ते १० वाजता मान्यवरांच्या हस्ते श्रींची महापूजा, मंगलस्नान व महाआरती संपन्न होणार आहे. त्यानंतर महाराष्ट्रात खरेदी-विक्रीसाठी प्रसिद्ध असलेल्या देवगड अश्वस्पर्धा व प्रदर्शनाचे उद्घाटन होणार आहे.
यात्रेच्या सांस्कृतिक कार्यक्रमांमध्ये रविवारी रात्री ९ ते १२ या वेळेत राष्ट्रपती पदक विजेत्या विठाबाई नारायणगावकर यांच्या कन्या मालती इनामदार यांचा लोकनाट्य तमाशाचा मोफत कार्यक्रम होणार आहे. तसेच रविवारी रात्री ९ ते १२ व सोमवारी सकाळी ८ ते १२ या वेळेत वाघ्या-मुरळी यांचा जागरण-गोंधळ कार्यक्रम रंगणार आहे. सोमवारी सकाळी ९ ते ११ या वेळेत मालती इनामदार लोकनाट्य तमाशाचा ‘हजेरी’ कार्यक्रम होणार असून, सोमवारी दुपारी ३ ते ५ या वेळेत श्री क्षेत्र देवगड केशरी हा भव्य कुस्त्यांचा हगामा आयोजित करण्यात आला आहे.या वर्षी सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन मोठ्या प्रमाणावर करण्यात आले असून, आद्यनृत्यांगणा पवळा भालेराव हिवरगावकर यांच्या समृद्ध कलावारशाची परंपरा जपत हिवरगाव पावसा कला नगरी राज्यभरातून येणाऱ्या कलाकारांच्या स्वागतासाठी सज्ज झाली आहे. संगमनेर तालुक्यासह राज्यभरातून येणाऱ्या खंडोबा भक्तांसाठी ही यात्रा एक खास पर्वणी ठरणार आहे.
यात्रा उत्सवासाठी आवश्यक ती सर्व तयारी पूर्ण झालेली असून या कामासाठी सर्व ग्रामस्थांचे सहकार्य लाभत आहे. तरी भाविकांनी माघ पौर्णिमा यात्रा उत्सवाला उपस्थित राहून दर्शनाचा लाभ घ्यावा व यात्रेची शोभा वाढवावी, असे आवाहन देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष बाबासाहेब पावसे, उपाध्यक्ष संतोष पावसे, सचिव अनिल गडाख, खजिनदार गणेश शिंदे, सर्व विश्वस्त मंडळ, देवगड अश्वप्रेमी संघटनेचे अध्यक्ष उत्तम जाधव, यात्रा उत्सव समिती अध्यक्ष मच्छिंद्र गडाख, हिवरगाव पावसा ग्रामपंचायत, विविध संस्था पदाधिकारी व ग्रामस्थांच्या वतीने करण्यात आले आहे.
