विद्यार्थिनींच्या सुरक्षिततेसाठी अहिल्यानगर पोलीस दल सज्ज..! ४ हजार मुलींना आत्मनिर्भरतेचा दिला मंत्र..शाळा-महाविद्यालयांत व्यापक जनजागृती अभियान
अहिल्यानगर (प्रतिनिधी):-विद्यार्थिनींना सुरक्षित,स्वाभिमानी आणि आत्मविश्वासाने जगता यावे यासाठी अहिल्यानगर जिल्हा पोलीस दल व जाणीव ट्रस्ट, वसई-विरार यांच्या संयुक्त विद्यमाने जिल्ह्यातील शाळा व महाविद्यालयांमध्ये व्यापक जनजागृती व मार्गदर्शन अभियान यशस्वीपणे राबविण्यात आले. दि.२८ जानेवारी ते ३१ जानेवारी २०२६ या कालावधीत इयत्ता ७ वी ते ९ वी मधील विद्यार्थिनींसाठी आयोजित या उपक्रमातून सुमारे ४ हजार विद्यार्थिनींना थेट मार्गदर्शन व प्रशिक्षण देण्यात आले.या उपक्रमात वक्ते श्री.मिलिंद पोखर यांच्या माध्यमातून विद्यार्थिनींना समाजात आत्मनिर्भरतेने कसे उभे राहावे,आत्मविश्वास व स्वाभिमान जपून सुरक्षित जीवन कसे जगावे याबाबत सखोल मार्गदर्शन करण्यात आले. यासोबतच समाजातील संभाव्य धोके,सायबर गुन्हे,ऑनलाईन फसवणूक, सोशल मीडियावरील धोके यांची स्पष्ट माहिती देत प्रत्यक्ष जीवनातील उदाहरणांद्वारे विद्यार्थिनींना सजग करण्यात आले.मार्गदर्शनादरम्यान एक अत्यंत महत्त्वाची आणि संवेदनशील बाब अधोरेखित करण्यात आली.अनेक वेळा या वयोगटातील मुलींना ओळखीच्या,निकटवर्ती किंवा विश्वासातील व्यक्तींकडूनच त्रास सहन करावा लागतो. मात्र भीती, लाज किंवा जास्त विश्वासामुळे अशा घटना पुढे येत नाहीत. याबाबत विद्यार्थिनींना स्पष्टपणे सजग करण्यात आले. या संवादातून काही विद्यार्थिनींनी स्वतःवर झालेल्या त्रासाबाबत मनमोकळेपणाने आपली व्यथा मांडली, ही या उपक्रमाची मोठी उपलब्धी ठरली.या सर्व प्रकरणांची गांभीर्याने दखल घेत अहिल्यानगर जिल्हा पोलीस दलाने संबंधित विद्यार्थिनींचा त्रास दूर करण्यासाठी आवश्यक ते सर्व सहकार्य व पुढील कायदेशीर कार्यवाही तत्काळ केली,हे विशेष उल्लेखनीय आहे. यामुळे विद्यार्थिनींमध्ये पोलिसांविषयी विश्वास अधिक दृढ झाला आहे.
हा समाजोपयोगी उपक्रम पुढील शाळा व महाविद्यालयांमध्ये राबविण्यात आला –
केंद्रीय विद्यालय क्र. 01, भिंगार कॅम्प
साई एंजल इंटरनॅशनल स्कूल, तवलेनगर
अंबिका विद्यालय, केडगाव
न्यू आर्ट कॉलेज, रेसिडेन्शियल, बालिकाश्रम रोड
श्रीकांत प्रेमराज गुगळे विद्यालय, माळीवाडा
प्रियदर्शनी विद्यालय, भिंगार
भाऊसाहेब फिरोदिया व अशोक फिरोदिया विद्यालय, माळीवाडा
ल. ना. होशिंग विद्यालय, जामखेड
भिंगार हायस्कूल, भिंगार
पोतदार इंटरनॅशनल हायस्कूल, केडगाव
अहिल्यानगर जिल्हा पोलीस दलाने स्पष्ट केले आहे की, विद्यार्थिनींच्या सुरक्षिततेसाठी असे उपक्रम भविष्यातही सातत्याने राबविण्यात येणार आहेत. जिल्ह्यातील ज्या शाळा, महाविद्यालये किंवा संस्था अशा प्रकारचे जनजागृती कार्यक्रम आयोजित करू इच्छित असतील, त्यांनी अहिल्यानगर पोलीस दलाशी संपर्क साधावा, असे आवाहनही करण्यात आले आहे.विद्यार्थिनींच्या सुरक्षित भविष्यासाठी पोलिसांचा हा उपक्रम निश्चितच दिशादर्शक आणि प्रेरणादायी ठरत आहे.
