CRIME..तहसील कार्यालयात लाचखोरीचा पर्दाफाश..!७ हजारांची लाच मागून स्वीकारणाऱ्या महसूल सहाय्यकावर एसीबीची कारवाई
अहिल्यानगर (प्रतिनिधी):-अहिल्यानगर जिल्ह्यातील कोपरगाव तहसील कार्यालयात लाचखोरीचा गंभीर प्रकार उघडकीस आला असून महसूल सहाय्यक महिलेवर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (एसीबी) कारवाई केली आहे. श्रीमती अंजना पंडित पवार (वय 36 वर्षे),महसूल सहाय्यक, वर्ग-3,तहसील कार्यालय, कोपरगाव,ता.कोपरगाव,जि. अहिल्यानगर) यांनी तक्रारदाराकडून 7,000 रुपये लाचेची मागणी करून ती स्वीकारल्याने त्यांच्या विरुद्ध भ्रष्टाचार प्रतिबंधक अधिनियम 1988 च्या कलम 7 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.या प्रकरणी कोपरगाव शहर पोलीस स्टेशन येथे गुन्हा नोंद क्रमांक /2026 दाखल करण्यात आला असून ही कारवाई लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, नाशिक / अहिल्यानगर यांनी दि. 02/02/2026 रोजी केली आहे.
तक्रारदार यांनी दिलेल्या माहितीनुसार,कोपरगाव तहसील कार्यालयातील कामकाज संदर्भात मा.न्यायालयाच्या आदेशानुसार मिळकतीचा वाटप तक्ता मंजूर करून ताबा देण्याचा आदेश तहसीलदारांकडून मिळवून देण्यासाठी महसूल सहाय्यक श्रीमती अंजना पंडित पवार यांनी 7,000 रुपयांची लाच मागितली होती.तक्रारदाराने याबाबत लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दाखल केल्यानंतर सापळा रचण्यात आला.सापळा कारवाई दरम्यान श्रीमती अंजना पंडित पवार यांनी स्वतःच्या पदाचा व अधिकाराचा गैरवापर करून तक्रारदाराकडून 7,000 रुपये लाच स्वीकारल्याचे निष्पन्न झाले.या कारवाईत सापळा अधिकारी पोलीस निरीक्षक श्रीमती छाया देवरे, लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, अहिल्यानगर,पर्यवेक्षण अधिकारी पोलीस उपअधीक्षक श्री.अजित त्रिपुटे यांच्या मार्गदर्शनाखाली सापळा यशस्वीपणे पार पडला. ही कारवाई पोलीस अंमलदार गजानन गायकवाड,सचिन सुद्रुक,वैभव सुपेकर,हरून शेख यांनी केली आहे.
