Ahilyanagar..तमाशा विश्वातील तेजस्वी परंपरेचा गौरव..!आद्यनृत्यांगणा पवळा हिवरगावकर लावणी सम्राज्ञी राज्यस्तरीय पुरस्काराने मालती इनामदार सन्मानित..लोककलेला वाहिलेल्या ४६ वर्षांच्या प्रदीर्घ सेवेचा सन्मान
Ahilyanagar..संगमनेर (प्रतिनिधी/नितीनचंद्र भालेराव):-संगमनेर तालुक्यातील हिवरगाव पावसा येथे श्री.क्षेत्र खंडोबा देवस्थान ट्रस्टच्या वतीने आयोजित देवगड यात्रा उत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. राष्ट्रसंत गाडगे महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेली ही भूमी तसेच आद्यनृत्यांगणा नामचंद पवळा भालेराव हिवरगावकर यांच्या समृद्ध कलावारशाची परंपरा जपणाऱ्या हिवरगाव पावसा कला नगरीत, लोकनाट्य तमाशाचा मोफत कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.या यात्रा उत्सवानिमित्त, तमाशा क्षेत्रात प्रथम पदार्पण करणाऱ्या आद्यनृत्यांगणा नामचंद पवळा भालेराव हिवरगावकर यांच्या स्मरणार्थ दरवर्षी लोककलावंतांना गौरविण्यात येते. कला सम्राज्ञी पवळा कला मंच तसेच महात्मा फुले, डॉ. बाबासाहेब आंबेडकर व राजर्षी शाहू विचार मंच यांच्या संयुक्त विद्यमाने दिला जाणारा हा प्रतिष्ठेचा पुरस्कार यंदा प्रसिद्ध लोककलावंत व लावणी सम्राज्ञी, राष्ट्रपती पदक विजेत्या विठाबाई नारायणगावकर यांच्या कन्या मालती इनामदार यांना प्रदान करण्यात आला.
मालती इनामदार यांनी अवघ्या दहाव्या वर्षी तमाशा क्षेत्रात पदार्पण केले. त्यानंतर तब्बल ४६ वर्षे विनोदी व प्रभावी अभिनयातून रसिकांच्या मनावर अधिराज्य गाजवले.थडग्यातून उठली सून, आई तुझं लेकरू, आता मला खुशाल फाशी द्या, मुंबईची केळीवली यांसारख्या अनेक पौराणिक, आध्यात्मिक, ऐतिहासिक, सामाजिक व धार्मिक विषयांवरील वगनाट्यांनी महाराष्ट्रभर लोकप्रियता मिळवली.लोककलेचा वारसा जपण्याचे आणि तमाशा परंपरा जिवंत ठेवण्याचे भरीव कार्य केल्याबद्दल आद्यनृत्यांगणा नामचंद पवळा भालेराव हिवरगावकर यांच्या स्मरणार्थ राज्यस्तरीय उत्कृष्ट तमाशा अभिनय सम्राट पुरस्काराने मालती इनामदार यांचा गौरव करण्यात आला.
👥 मान्यवरांची उपस्थिती :
या गौरव सोहळ्यास राजहंस दूध संघाचे संचालक डॉ. प्रमोद पावसे,शिवसेना (शिंदे) जिल्हा पदाधिकारी सोमनाथ भालेराव,शिवसेना (उबाठा) संगमनेर तालुका प्रमुख भीमाशंकर पावसे,सामाजिक कार्यकर्ते व सेवानिवृत्त शिक्षक बाबुराव पावसे,देवगड देवस्थान अध्यक्ष बाबासाहेब पावसे,कला सम्राज्ञी पवळा कला मंचाचे सचिव नितीनचंद्र भालेराव,पोलीस पाटील मथाजी पावसे,सेवानिवृत्त पोलीस निरीक्षक नारायण पावसे,उपाध्यक्ष संतोष पावसे,सचिव अनिल गडाख,खजिनदार गणेश शिंदे,विश्वस्त सोमनाथ पावसे यांच्यासह देवगड देवस्थानचे सर्व विश्वस्त,रोहिणी भालेराव, दीपक भालेराव, विकास दारोळे, समाधान भालेराव, साई भालेराव तसेच हिवरगाव पावसा ग्रामस्थ व कला प्रेमी नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.लोककलेचा सन्मान, परंपरेचा गौरव आणि नव्या पिढीसाठी प्रेरणादायी ठरलेला हा सोहळा उपस्थितांच्या मनावर खोल ठसा उमटवून गेला.
