अहिल्यानगरात संतांचा दिव्य संगम..! राधाकृष्णजी महाराजांच्या प्रवचनाची सुवर्णसंधी भास्करगिरी महाराजांच्या आगमनाने भक्तांमध्ये उत्साह शिगेला..
अहिल्यानगर (प्रतिनिधी) – शहरातील भक्तांसाठी अत्यंत आनंदाची आणि आध्यात्मिक उर्जा देणारी बातमी समोर आली आहे. संत-सद्गुरूंच्या पवित्र दर्शनासह त्यांच्या प्रवचनाचा लाभ घेण्याची दुर्मिळ संधी अहिल्यानगरकरांना लाभणार आहे.शहरातील गुरुदत्त भक्तीधाम, संत किसनगिरीनगर मंदिर येथे रविवार दिनांक ५ एप्रिल २०२६ रोजी सायंकाळी ६.३० वाजता परमपूज्य गोवत्स हभप श्री राधाकृष्णजी महाराज (जोधपूर) तसेच सद्गुरु हभप भास्करगिरी महाराज यांचे भव्य आगमन होणार आहे. या प्रसंगी दोन्ही संतांच्या दर्शनाचा दुग्धशर्करा योग भक्तांना अनुभवता येणार असून, अध्यात्मिक वातावरणाने परिसर भारावून जाणार आहे.
विशेष म्हणजे, परमपूज्य श्री राधाकृष्णजी महाराज यांच्या मधुर व प्रभावी वाणीमधून भक्तांना प्रेरणादायी प्रवचनाचा लाभ मिळणार आहे. त्यांच्या कीर्तन-प्रवचनातून भक्ती, सदाचार आणि अध्यात्मिक जीवनाचे महत्त्व अधोरेखित केले जाणार आहे. त्यामुळे भक्तांसाठी हा कार्यक्रम केवळ धार्मिकच नव्हे तर जीवनाला दिशा देणारा ठरणार आहे.या दिव्य सोहळ्यामुळे परिसरात आधीच उत्साहाचे वातावरण निर्माण झाले असून, भाविक मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याची तयारी करत आहेत. संतांचा सहवास, सत्संग आणि प्रवचन यांचा त्रिवेणी संगम अनुभवण्याची ही सुवर्णसंधी असल्याने भक्तांमध्ये विशेष उत्सुकता पाहायला मिळत आहे.
या कार्यक्रमासाठी श्री समर्थ सद्गुरु किसनगिरीबाबा नगर भक्तमंडळ तसेच बन्सी महाराज मिठाईवाले यांच्या वतीने सर्व भाविकांना उपस्थित राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे. भक्तांनी या पवित्र प्रसंगी मोठ्या संख्येने उपस्थित राहून संतांच्या आशीर्वादाचा लाभ घ्यावा, असेही आवर्जून सांगण्यात आले आहे.
