Tamasha..तमाशा कलावंतांवर हल्ला करणाऱ्यांना कठोर शिक्षा करा – श्रीकांत भालेराव..हिवरगाव पावसा येथे कला सम्राज्ञी पवळा कला मंचाने केला निषेध
संगमनेर प्रतिनिधी (नितीनचंद्र भालेराव):-संगमनेर तालुक्यातील पुणे-नाशिक राष्ट्रीय महामार्गावरील वरूडी फाटा येथे तमाशा कलावंतांच्या वाहनाला एका वाहनचालकाने कट मारत, इतरांना बोलावून घेत कलावंतांना बेदम मारहाण केली. या घटनेत महिला कलावंतांशी असभ्य वर्तन करण्यात आल्याची धक्कादायक घटना बुधवारी घडली आहे. राष्ट्रपती सुवर्णपदक विजेत्या दिवंगत विठाबाई भाऊ नारायणगावकर यांच्या तमाशा फडातील कलावंतावरील हल्ल्याचा तीव्र निषेध करत गुन्हेगारांवर कठोर दंडात्मक कारवाईचे मागणी करण्यात आली आहे. कलावंतांवरील हल्ला म्हणजे महाराष्ट्राच्या लोक संस्कृतीवर झालेला हल्ला आहे.सदर घटनेचा सखोल तपास करून गुन्हेगारांना दंडात्मक शिक्षा न झाल्यास तमाशा व लोक कलावंत संघटनांमार्फत राज्यभरात तीव्र आंदोलन करण्याचा इशारा कला सम्राज्ञी पवळा कला मंचाचे अध्यक्ष तथा रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे प्रदेशाध्यक्ष उपाध्यक्ष श्रीकांत भालेराव यांनी दिला.
संगमनेर तालुका कलावंतांची जन्मभूमी म्हणून ओळखला जातो. पुरोगामी विचाराच्या तालुक्यामध्ये कलावंतांवर झालेला हल्ल्याचा कला सम्राज्ञी पवळा कला मंच आणि हिवरगाव पावसा ग्रामस्थांनी निषेध घटनेचा केला. आद्यनृत्यांगणा पवळा भालेराव हिवरगावकर यांचे पणतू नितीनचंद्र भालेराव,सरपंच सुभाष गडाख,भाजपाचे काशिनाथ पावसे,शिवसेना तालुका प्रमुख भीमाशंकर पावसे,वृक्षमित्र गणपत पावसे,ज्येष्ठ संपादक यादवराव पावसे,सरपंच सेवा संघाचे नेते बाबासाहेब पावसे,भाजपाचे तालुका सरचिटणीस गणेश दवंगे,प्रा.बाबुराव पावसे,केशव दवंगे,हरिश्चंद्र भालेराव यांनी एकत्र येत घटनेचा तीव्र शब्दात निषेध व्यक्त केला.
कलावंत हल्ल्यातील गुन्हेगारांवर कठोर कारवाईचे आश्वासन : सहाय्यक पोलीस निरीक्षक थोरात
राष्ट्रपती पदक विजेत्या विठाबाई नारायणगावकर यांच्या तमाशातील कलावंतांवर झालेल्या निंदनीय हल्ल्याच्या बातमी मिळताच कला सम्राज्ञी पवळा कला मंचाचे अध्यक्ष श्रीकांत भालेराव यांनी घारगाव पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक थोरात यांना फोनवरून संपर्क केला. घटनेतील गुन्हेगारांना कठोर शासन करण्याचे मागणी केली. त्यानुसार सहाय्यक पोलीस निरीक्षक थोरात यांनी चार गुन्हेगारांना पकडण्यात आल्याचे माहिती दिली. गुन्हेगारांवर गंभीर दुखापत, मारहाण महिला कलावंतांना मारहाण तसेच रोख रक्कम चोरी विविध कलमा अंतर्गत गुन्हे दाखल करण्यात आले आहे.घटनेतील इतर आरोपींचा शोध घेतला जात आहे तसेच दोषींना कठोर शासन केले जाईल आणि कलावंतांना न्याय देण्याचे आश्वासन घारगाव पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक थोरात यांनी दिले.
