Murder..लोकेशन बदलूनही सुटले नाहीत ‘त्या’ खुनातील आरोपी..पोलिसांनी ‘असा’ रचला सापळा..वाचा सविस्तर
अहिल्यानगर (शेवगाव प्रतिनिधी):- शेवगाव तालुक्यातील सालवडगाव येथील संदीप लांडे यांच्या निर्घृण हत्या प्रकरणाचा छडा लावण्यात शेवगाव पोलिसांना यश आले आहे.या गुन्ह्यातील मुख्य आरोपी रामा गाडे आणि त्याच्या एका विधीसंघर्षित (अल्पवयीन) साथीदाराला पोलिसांनी अवघ्या पाच दिवसांत बेड्या ठोकल्या आहेत.पोलिसांच्या या वेगवान कामगिरीमुळे गुन्हेगारांचे धाबे दणाणले असून,सर्वत्र पोलिसांचे कौतुक होत आहे.मिळालेल्या माहितीनुसार,११ एप्रिल रोजी सालवडगाव येथील संदीप दिनकर लांडे (वय ३२) हे आपल्या शेतात काम करत होते. दुपारी काही परिचितांनी “काहीतरी काम आहे” असे सांगून त्यांना शेवगाव येथे बोलावून घेतले.दरम्यान, शेवगाव येथील ढाकणे वस्ती आणि डायमंड शाळेच्या पाठीमागील निर्जन परिसरात आरोपी व मयत संदीप यांच्यात किरकोळ कारणावरून बाचाबाची झाली.
वादाचे रूपांतर काही वेळातच हिंसक हाणामारीत झाले.मुख्य आरोपी रामा गाडे आणि त्याच्या साथीदाराने रागाच्या भरात संदीप लांडे यांच्यावर लाकडी काठी,कमरेचा बेल्ट आणि दगडाने अमानुष हल्ला चढवला. हा हल्ला इतका भीषण होता की, संदीप लांडे यांचा जागीच मृत्यू झाला.घटनेनंतर आरोपींनी घटनास्थळावरून पळ काढला होता.या घटनेने शेवगाव परिसरात मोठी खळबळ उडाली होती. मयताचे वडील दिनकर लांडे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून शेवगाव पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला.उपविभागीय पोलीस अधिकारी आणि पोलीस निरीक्षकांच्या मार्गदर्शनाखाली पथके तयार करून फरार आरोपींचा शोध सुरू करण्यात आला.आरोपींच्या मोबाईल लोकेशन आणि खबऱ्यांच्या माहितीवरून पोलिसांनी सापळा रचला.आरोपी सातत्याने आपली ठिकाणे बदलत होते, मात्र पोलिसांनी पाठलाग सोडून पाचव्या दिवशी त्यांना अटक केली.मुख्य आरोपी रामा गाडे आणि एका बाल गुन्हेगाराला ताब्यात घेण्यात आले आहे.
एका तरुण शेतकऱ्याची अशा प्रकारे हत्या झाल्यामुळे सालवडगाव परिसरात संतापाचे वातावरण होते.मात्र,पोलिसांनी अत्यंत संवेदनशीलतेने आणि कार्यक्षमतेने तपास करत आरोपींना जेरबंद केल्यामुळे मृताच्या नातेवाईकांनी आणि ग्रामस्थांनी समाधान व्यक्त केले आहे.”गुन्हेगारांना कायद्याचा धाक असलाच पाहिजे, हे या कारवाईतून शेवगाव पोलिसांनी सिद्ध केले आहे,” अशा प्रतिक्रिया उमटत आहेत. पुढील तपास शेवगाव पोलीस करत आहेत.
