अण्णाभाऊ साठे पुरस्कारप्राप्त व्यक्तींच्या मानधनाचा प्रश्न अखेर सुटणार? ‘अ.ब.क.ड’ उपवर्गीकरणाच्या अंमलबजावणीसाठी अहिल्यानगर सकल मातंग समाज थेट मंत्रालयात.. लवकरच अहिल्यानगर मध्ये सकल मातंग समाज भव्य मेळावा होणार आमदार अमित गोरखे
मुंबई (विशेष प्रतिनिधी):-मातंग समाजाच्या प्रलंबित मागण्यांसाठी आणि प्रामुख्याने ‘अ, ब, क, ड’ उपवर्गीकरणाची राज्यात तातडीने अंमलबजावणी व्हावी या मुख्य मागणीसाठी अहिल्यानगर येथील सकल मातंग समाजाच्या वतीने मुंबई मंत्रालयात मंगळवारी (दि.९ जून २०२६) एक अत्यंत महत्त्वाची भेट घेतली.मातंग समाजाचे ज्येष्ठ समाजसेवक, लोकशाहीर अण्णाभाऊ साठे पुरस्कार विजेते नामदेवराव चांदणे यांच्या नेतृत्वाखाली आणि ‘ॲक्टिव्ह मराठी उद्योग समूह’ व महालक्ष्मी देवस्थानचे अध्यक्ष उमेश साठे (पत्रकार) यांच्या विशेष उपस्थितीत आमदार अमितजी गोरखे यांची मंत्रालयात भेट घेऊन त्यांना मागण्यांचे सविस्तर निवेदन देण्यात आले.
यावेळी अ.ब.क.ड. उपवर्गीकरणासंदर्भात उमेश साठे यांनी मातंग समाजाची आक्रमक भूमिका मांडत आपली प्रतिक्रिया व्यक्त केली. आमदार अमितजी गोरखे यांनी शिष्टमंडळाच्या मागण्या अतिशय सकारात्मकतेने ऐकून घेतल्या. “अ.ब.क.ड. उपवर्गीकरणासंदर्भात समाज बांधवांनी दिलेले हे निवेदन शासनाकडे तात्काळ पाठवून, त्याची लवकरात लवकर अंमलबजावणी व्हावी यासाठी मी स्वतः वैयक्तिक पातळीवर प्राधान्याने प्रयत्न करेन,” असे खंबीर आश्वासन आमदार गोरखे यांनी यावेळी दिले. तसेच,या लढ्याला अधिक व्यापक स्वरूप देण्यासाठी लवकरच अहिल्यानगर शहरात ‘सकल मातंग समाज मेळावा’ आयोजित केला जाईल आणि त्याची तारीख मी स्वतः लवकरच जाहीर करेन,अशी मोठी घोषणाही आमदार गोरखे यांनी यावेळी केली.दरमहा १५ हजार मानधन आणि मोफत एसटी प्रवासाचे आश्वासन!
याच दौऱ्यादरम्यान, शिष्टमंडळाने राज्याचे परिवहन मंत्री नामदार प्रतापराव सरनाईक यांचीही मुंबई मंत्रालयात समक्ष भेट घेतली. या भेटीत मातंग समाज आणि एकूणच उपेक्षित घटकांसाठी दोन अत्यंत महत्त्वाच्या मागण्या करण्यात आल्या:
१) साहित्यसम्राट लोकशाहीर अण्णाभाऊ साठे पुरस्कार आणि महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर समाजभूषण पुरस्कार प्राप्त व्यक्तींना दरमहा १५,००० रुपये मानधन मिळावे.
२) या पुरस्कारप्राप्त व्यक्तींना एसटी महामंडळाच्या सर्व बसेसमध्ये विनामूल्य (मोफत) प्रवास करण्याची सवलत मिळावी.
या मागण्यांवर सकारात्मक प्रतिसाद देत परिवहन मंत्री नामदार प्रतापराव सरनाईक यांनी, “या अत्यंत रास्त मागण्या असून, त्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत मंजूर करून आणण्यासाठी मी माझे सर्वतोपरी प्रयत्न करेन,” असे आश्वासन दिले.मंत्र्यांच्या या सकारात्मक भूमिकेनंतर उपस्थित सर्व समाज बांधवांनी त्यांचे मनापासून आभार मानले.या महत्त्वपूर्ण आंदोलनात आणि निवेदन देताना संतोष शेलार, सतीश खळवे, राजेंद्र आल्हाट, संजय शेलार, प्रमोद आरणे, शेषराव कारखेलेकर, संजय विरूळे, गोविंद सूर्यवंशी, अविनाश साठे, लक्ष्मण तिकटे, सुदामराव आवाडे यांच्यासह अहिल्यानगर जिल्ह्यातील सकल मातंग समाजाचे अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
