दिल्लीच्या तख्ताला थेट इशारा..! मराठा साम्राज्याचा नकाशा अभ्यासक्रमातून गायब केल्याने मुंबईत प्रचंड आक्रोश.. ‘या’ मोठ्या घराण्यांचे वंशज उतरले रस्त्यावर!
मुंबई ९ जून (प्रतिनिधी):-एनसीईआरटीने (NCERT) सीबीएसईच्या (CBSE) इयत्ता आठवीच्या अभ्यासक्रमातून मराठा साम्राज्याचा गौरवशाली नकाशा वगळल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.या निर्णयामुळे संपूर्ण महाराष्ट्रात प्रचंड असंतोषाची लाट पसरली असून,त्याचाच तीव्र प्रत्यय आज मुंबईतील ऐतिहासिक आझाद मैदानावर पाहायला मिळाला.या अन्यायाविरोधात आज हजारो शिव-शंभू प्रेमींनी मुंबईत ‘आक्रोश मोर्चा’ काढत थेट दिल्ली प्रशासनाला आव्हान दिले.नागपूर संस्थानचे वंशज श्रीमंत मुधोजीराजे भोसले यांच्या खंबीर नेतृत्वाखाली या आंदोलनाचे आयोजन करण्यात आले होते. या मोर्चामध्ये महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून केवळ नागरिकच नव्हे,तर मराठा इतिहासात सुवर्णअक्षरांनी नाव कोरलेल्या थोर वीरांचे वंशजही मोठ्या संख्येने रस्त्यावर उतरले होते.
यात प्रामुख्याने:
रामनारायण भोसले परिवार (पानिपत येथील मराठा वंशज)
कुनाल मालुसरे (नरवीर तानाजी मालुसरे यांचे वंशज)
शिवाजीराजे जाधव (लखुजीराजे जाधव घराण्याचे वंशज)
ॲड.आशिषराजे गायकवाड (बडोद्याचे सयाजीराव गायकवाड महाराज यांचे वंशज)
सुरेंद्र इंगळे आणि इतर मान्यवरांचा समावेश होता.
आंदोलनाला संबोधित करताना नागपूर संस्थानचे वंशज मुधोजीराजे भोसले कमालीचे आक्रमक झाले होते. त्यांनी प्रशासनाला इशारा दिला की,मराठा साम्राज्याचा नकाशा सीबीएसई बोर्डाने तातडीने अभ्यासक्रमात पूर्ववत समाविष्ट करावा.प्रशासनाने या संवेदनशील विषयात त्वरित लक्ष घालावे.केंद्राने महाराष्ट्राच्या स्वाभिमानाशी खेळू नये,अन्यथा मराठ्यांना दिल्लीच्या जंतरमंतरवर जाऊन आंदोलन करण्याची वेळ येऊ देऊ नका;तिथला संघर्ष दिल्लीला झेपणार नाही.
या आंदोलनात छावा संघटनेचे नानासाहेब जावळे पाटील, शिवप्रतिष्ठानचे राहुल ढेंबरे पाटील,वीरेंद्र पवार यांसह मराठा क्रांती मोर्चाचे डॉ. कांचन पाटील,प्रशांत सावंत, अरुण काकडे, सचिन गायकवाड, ऋषिकेश काकडे, नवनाथ गायकवाड आणि बाळासाहेब इंगळे यांनी सक्रिय सहभाग नोंदवत आपल्या भावना व्यक्त केल्या. कार्यक्रमाचे प्रास्ताविक आणि उत्कृष्ट सूत्रसंचालन प्रसिद्ध इतिहास अभ्यासक ललित पाटील यांनी केले. या आंदोलनाला शालेय विद्यार्थी आणि मुंबईकरांनी मोठी गर्दी केली होती.आंदोलनाची तीव्रता आणि जनक्षोभ लक्षात घेता,महाराष्ट्राचे शालेय शिक्षण राज्यमंत्री पंकजजी भोईर यांनी तात्काळ आझाद मैदानावरील आंदोलनस्थळाला भेट दिली.त्यांनी आंदोलकांच्या भावना समजून घेत,या गंभीर विषयावर थेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत चर्चा करण्यासाठी आंदोलकांच्या प्रमुख शिष्टमंडळाला अधिकृत आमंत्रण दिले आहे.आता राज्य सरकार यावर काय पाऊल उचलते आणि दिल्लीचे शिक्षण मंडळ हा नकाशा पुन्हा समाविष्ट करते का, याकडे संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागले आहे.
