संगमनेर तालुक्यातील पारेगाव बुद्रुक येथे घडतंय आश्चर्य..! तब्बल ८० फूट उंच,दीड कोटींचं अशवीनाथ महाराजांचे भव्य मंदिर पाहून तुम्हीही थक्क व्हाल..पाहा काय आहे वैशिष्ट्य?
संगमनेर/दत्तात्रय घोलप:-अहिल्यानगर व नाशिक जिल्ह्यातील लाखो भाविकांचे श्रद्धास्थान आणि संगमनेर तालुक्यातील पारेगाव बुद्रुक येथील ग्रामस्थांचे जागृत देवस्थान असलेल्या श्री. अशवीनाथ महाराजांच्या भव्य दिव्य मंदिराचे बांधकाम सध्या अंतिम टप्प्यात आले आहे.हे मंदिर केवळ तालुक्यातच नव्हे, तर संपूर्ण महाराष्ट्रात भाविकांच्या आकर्षणाचा मुख्य केंद्रबिंदू ठरणार आहे.
काय आहे या मंदिराचे खास वैशिष्ट्य?
भव्य उंची: मंदिराची एकूण उंची तब्बल ८० फूट असणार आहे.
नयनरम्य कळस:मंदिरावर ५१ फुटी भव्य कळस विराजमान होणार असून,त्याचे सुबक आणि आखीव-रेखीव नक्षीकाम पाहता क्षणीच डोळे दिपवून टाकणारे आहे.
दीड कोटींचा खर्च: या संपूर्ण मंदिराच्या बांधकामासाठी जवळपास १.५ कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित आहे.
लोकसहभागातून उभे राहतेय भव्य वास्तू
या ऐतिहासिक मंदिराच्या उभारणीसाठी पारेगाव बुद्रुकच्या सर्व ग्रामस्थांनी मोठे आर्थिक योगदान दिले आहे. त्याचबरोबर पंचक्रोशीतील आणि बाहेरील जिल्ह्यातील भाविकांनीही सढळ हाताने मदत केली आहे.ग्रामस्थ आणि भाविकांच्या याच अतूट श्रद्धेमुळे हे देखणे मंदिर आता पूर्णत्वाकडे जात आहे.
श्रावणात भरणार लाखो भाविकांचा जत्रा उत्सव
सालाबादप्रमाणे दरवर्षी श्रावण महिन्यात या ठिकाणी अशवीनाथ महाराजांचा भव्य यात्रोत्सव मोठ्या भक्तीभावाने साजरा केला जातो.या यात्रेसाठी संपूर्ण महाराष्ट्रातून लाखो भाविक हजेरी लावतात. यंदा मंदिराचे नवीन रूप भाविकांना पाहायला मिळणार असल्याने यात्रेचा उत्साह द्विगुणित होणार आहे,अशा भावना स्थानिक भाविकांनी यावेळी बोलताना व्यक्त केल्या.
…तर तुम्हीही करू शकता मदत!
देवस्थान कमिटीच्या वतीने आवाहन करण्यात आले आहे की,ज्या भाविकांना या पवित्र कार्यत आणि मंदिर बांधकामासाठी सढळ हाताने आर्थिक मदत करायची असेल, त्यांनी थेट देवस्थान कमिटीशी संपर्क साधावा.अवघ्या काही दिवसांतच दीड कोटींचे हे अद्भूत मंदिर भाविकांच्या सेवेत दाखल होणार आहे.
