जेऊरमध्ये छुप्या शेडमध्ये चालायचा माव्याचा काळा धंदा..एमआयडीसी पोलीस व अन्न-औषध प्रशासन छापा..लाखो रुपयांच्या मुद्देमालासह मावा कारखानदार गजाआड
अहिल्यानगर (प्रतिनिधी):-अहिल्यानगर जिल्ह्यातील एमआयडीसी पोलीस स्टेशनच्या हद्दीत येणाऱ्या जेऊर बायजाबाई परिसरातून एक अत्यंत धक्कादायक प्रकार समोर आला आहे.नागरिकांच्या आरोग्याशी जीवघेणा खेळ खेळणाऱ्या एका मोठ्या अवैध मावा कारखान्याचा पोलिसांनी पर्दाफाश केला आहे.छुप्या पद्धतीने पत्र्याच्या शेडमध्ये सुरू असलेल्या या कारखान्यावर एमआयडीसी पोलीस आणि अन्न व औषध प्रशासन विभागाने (FDA) मंगळवारी (दि.९ जून) सकाळी संयुक्त ‘सर्जिकल स्ट्राईक’ केला.या धडक कारवाईत लाखो रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून,या कारवाईमुळे जिल्ह्यातील अवैध तंबाखू आणि मावा माफियांचे धाबे दणाणले आहेत.मिळालेल्या खात्रीशीर माहितीनुसार,जेऊर बायजाबाई परिसरातील एका पत्र्याच्या शेडमध्ये शासनाने प्रतिबंधित केलेला सुगंधी तंबाखू,सुपारी आणि रसायने वापरून मोठ्या प्रमाणावर घातक मावा तयार केला जात होता.ही माहिती मिळताच एमआयडीसी पोलीस स्टेशनचे पथक आणि अन्न व औषध प्रशासन विभागाच्या अधिकाऱ्यांनी कोणताही वेळ न घालवता मंगळवारी सकाळी साडेदहा वाजण्याच्या सुमारास नियोजनबद्ध पद्धतीने या शेडवर छापा टाकला.
पोलीस आणि प्रशासनाचे पथक अचानक दारात उभे राहिलेले पाहून आतमध्ये बेकायदेशीर काम करणाऱ्यांची पळापळ झाली. मात्र, अधिकाऱ्यांनी सतर्कता दाखवत मुख्य आरोपीला जागेवरच बेड्या ठोकल्या.
छाप्यादरम्यान प्रशांत रामदास मगर (वय ३३, रा. मगरवस्ती, जेऊर बायजाबाई, अहिल्यानगर) हा आरोपी लोखंडी मशीनच्या सहाय्याने बेकायदेशीरपणे मावा तयार करताना रंगेहात आढळून आला.पोलिसांनी आणि अन्न-औषध प्रशासनाने संपूर्ण परिसराची कसून झडती घेतली.या झडतीत मोठ्या प्रमाणावर सुगंधी तंबाखू (प्रतिबंधित) विक्रीसाठी तयार केलेला घातक मावा कात्री सुपारी आणि आख्खी सुपारीचा साठा
मावा मिक्स करण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या ३ मोठ्या लोखंडी मशिन्स या संपूर्ण कारवाईत एकूण २ लाख ६९ हजार २५० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. मावा तयार करण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या मशिन्स जप्त करून पोलिसांनी हा कारखाना समूळ उद्ध्वस्त केला आहे.याप्रकरणी आरोपी प्रशांत मगर याच्याविरुद्ध एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा रजिस्टर क्रमांक ४०७/२०२६ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोग्याशी खेळणाऱ्या या आरोपी विरुद्ध नवीन भारतीय न्याय संहिता (BNS) आणि अन्न सुरक्षा व मानके कायदा २००६ मधील विविध कठोर कलमांनुसार कारवाई करण्यात आली आहे.या गुन्ह्यामुळे आरोपीला मोठी शिक्षा होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.अन्नपदार्थांच्या नावाखाली तरुण पिढीला नशेच्या आहारी ढकलणाऱ्या आणि कॅन्सरसारख्या आजारांना आमंत्रण देणाऱ्या अवैध मावा उत्पादकांविरोधात प्रशासनाने अत्यंत कठोर भूमिका घेतली आहे. “जिल्ह्यात कुठेही असे अवैध प्रकार सुरू असल्यास नागरिकांनी माहिती द्यावी, दोषींची गय केली जाणार नाही,” असा कडक इशारा प्रशासनाने दिला आहे.
जिल्ह्यात आगामी काळात अशा अनेक अवैध अड्ड्यांवर धडक कारवाया होण्याची दाट शक्यता आहे.ही कारवाई पोलीस अधीक्षक मुम्मका सुदर्शन,अपर पोलीस अधीक्षक वैभव कलुबर्मे आणि उपविभागीय पोलीस अधिकारी शिरीष वमने यांच्या मार्गदर्शनाखाली एमआयडीसी पोलीस स्टेशनचे प्रभारी अधिकारी सपोनि माणिक चौधरी,पोलीस हेडकॉन्स्टेबल राजू सुद्रीक, आजीनाथ पालवे,किशोर जाधव,राहुल ढाकणे तसेच अन्न व औषध प्रशासन विभागाचे सहाय्यक आयुक्त जी.व्ही.जगताप,साजिदा मुल्ला,सोपान इंगळे आणि किरण जगदाळे यांच्या संयुक्त पथकाने मोलाची कामगिरी बजावली.या कामगिरीबद्दल त्यांचे सर्वत्र कौतुक होत आहे.
